राज्यपाल पद, मंत्रीपद विसरा; पितृपक्षाच्या तोंडावर मिंधेंच्या तीन अतृप्त आमदारांना औट  घटकेचे महामंडळ

मिंधे गटातील एक आमदार आणि दोन माजी खासदारांना खूष करण्यासाठी पितृपक्षाच्या तोंडावर महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. यातील एका माजी खासदाराला राज्यपाल पदाचे आमिष दाखवल्याने तो मिंधे गटात गेला होता. पण कसले राज्यपाल पद आणि कसले काय… त्यालाही अवघ्या एक महिन्यासाठी महामंडळ स्वीकारावेच लागले. मिंधे गटाने तीन अतृप्त आमदारांना आज शांत केले, अशी चर्चा या नियुत्त्यांनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या मध्यावर होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिले होते. तरीही त्यांनी आज आपल्या गटातील नाराजांना खूष करण्यासाठी त्यांची महामंडळांवर वर्णी लावली. मंत्रिपदाची वाट पाहता पाहता थकलेले आमदार संजय शिरसाट यांच्या पदरात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोचे अध्यक्षपद पडले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापले गेलेले यवतमाळ-वाशिमचे माजी खासदार हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे राज्यपाल पदाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. राज्यपाल पद देण्याचे आश्वासन मिळाल्याने आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो असे त्यांनी अनेकदा जाहिररित्या बोलून दाखवले होते. परंतु त्यांच्या वाट्यालाही महामंडळच आले आहे. अडसूळ यांची नियुक्ती राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.