Baba Siddique Murder : झिशान सिद्दीकीही होते मारेकऱ्यांच्या टार्गेटवर, मुंबई पोलिसांचा खुलासा

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. केवळ बाबा सिद्दीकीच नव्हे तर झिशान सिद्दीकीही मारेकऱ्यांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अटक आरोपींनी चौकशीत झिशान सिद्दीकीही बिष्णोई गँगच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी दोघांना मारण्याची सुपारी आरोपींना देण्यात आली होती. तसेच दोघांना एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर येईल त्याला मारण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर दबा धरुन बसले होते. यादरम्यान बाबा सिद्दीकी कार्यालयाबाहेर येताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला.

सिद्दीकी यांची हत्या करण्याआधी आरोपी दररोज रेकी करत होते. आरोपी कुर्ल्यात भाड्याच्या घरात राहत होते. दररोज कुर्ल्याहून वांद्रे येथे रिक्षाने येत असत आणि सिद्दीकी पिता-पुत्रांच्या ठिकाणांची रेकी करत असत. घटनेच्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी कार्यलयात एकत्र असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानुसार आरोपी सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते.