100 कि.मी. चालत वाघ पोहोचला चांदोली अभयारण्यात! तिलारी ते सह्याद्री भ्रमण मार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल

पश्चिम महाराष्ट्रात वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एक वाघ मुक्कामी आला आहे. वर्षभरापूर्वी दाखल झालेला पहिला वाघ सह्याद्रीच्या कुशीत सुखेनैव नांदत आहे. त्याच्याच साथीला दुसऱया वाघाने नैसर्गिक स्थलांतर केले आहे. हा वाघ राधानगरी वन्यजीव अभयारण्यातून 100 किलोमीटर चालत चांदोली सह्याद्रीच्या अभयारण्यात पोचला. त्यामुळे तिलारी ते सह्याद्री भ्रमण मार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2018नंतर गेल्या वर्षी 17 डिसेंबरला पहिल्यांदाच वाघाची नोंद झाली होती. त्याचे नामकरण ‘एसटीआर-1’ अर्थात सह्याद्री टायगर रिझर्व्ह टी-1’ असे केले होते. त्याच धर्तीवर ऑक्टोबर अखेरीस कॅमेऱयात पैद झालेल्या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-2’ असे केले आहे. या वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱयांना यश आले असून दुसरा वाघ मुक्कामी आल्याने सह्याद्रीची कूस वाघांना अनुकूल बनल्याची प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करीत आहेत. ‘एसटीआर-2’ हा नर वाघ असून त्याचे छायाचित्र 24 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 46 मिनिटांनी चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेला कॅमेरा ट्रॅपने टिपला. हे छायाचित्र व्याघ्रप्रकल्पातील ‘टायगर सेल’ संशोधन विभागाने तपासले. त्या वेळी ते छायाचित्र वर्षभरापासून मुक्कामी असलेल्या ‘एसटीआर-1’ नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील अभ्यासात ‘एसटीआर-2’चा राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील वावर उघडकीस आला. हा वाघ यापूर्वी 23 एप्रिल 2022 रोजी राधानगरी वन्यजीव अभयारण्यात निदर्शनास आला होता.

सह्याद्रीत पहिला वाघ वर्षभर स्थिरावला

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सहसा वाघ स्थिरावत नाही, असे म्हटले जायचे. मात्र गेल्या वर्षभरातील सर्व्हेक्षणात वातावरण बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. 17 डिसेंबर 2023 रोजी प्रथमच सह्याद्री वाघ्र प्रकल्पात दिसलेला वाघ मागील वर्षभर याच परिसरात स्थिरावला आहे. सह्याद्रीतील कर्मचाऱयांनी मुसळधार पावसातदेखील त्या वाघाच्या हालचालींवर देखरेख ठेवली होती. त्यात वाघाने कुठल्याही परिस्थितीत सह्याद्रीची कूस सोडली नसल्याचे स्पष्ट झाले.

तिलारी ते राधानगरीत वाघांच्या संख्येत वाढ

मागील काही वर्षांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेला असलेल्या तिलारी ते राधानगरी भ्रमण मार्गामध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ‘एसटीआर-1’ व ‘एसटीआर-2’ हे दोन्ही नर वाघ तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमण मार्गामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले आहेत.

मादीच्या शोधात कापले 100 कि.मी.चे अंतर

दोन वर्षे राधानगरीमध्ये वावरणाऱया वाघाने मादीच्या शोधात 100 किलोमीटरचे अंतर कापले. राधानगरीत 13 एप्रिल 2024 रोजी या वाघाचे शेवटचे छायाचित्र टिपले होते. हा वाघ सहा ते सात वर्षांचा आहे. तो मादीचा शोध घेत आहे. मात्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मादी वाघाचे अस्तित्व नाही. येथे ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून वाघिणीचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱयांनी सांगितले.