कोंबडीचं जिवंत पिल्लू गिळल्याने तरुणाचा गुदमरून मृत्यू, छत्तीसगडमधील धक्कादायक घटना

छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने कोंबडीचं जिवंत पिल्लू गिळल्याची घटना अंबिकापूर जिल्ह्यात घडली आहे. पिल्लू गिळल्यानंतर तरुणाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे गुरमरून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आनंद यादव अंघोळीनंतर चक्कर येऊन पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरवातीला तरुणाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनामध्ये तरुणाच्या गळ्यात 20 सेमी लांबीचे कोंबडीचे पिल्लू आढळले.

पिल्लाचा एक भाग श्वासनलिकेत तर दुसरा अन्ननलिकेत अडकला होता. आनंदला मूल होत नव्हते. त्यामुळे संतती प्राप्तीसाठी त्याने तांत्रिकाच्या सांगण्यावरून असे कृत्य केले असावे अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.