स्टंट करताना झोपाळ्याच्या हूकमध्ये गळ्यातील टाय अडकला, 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

घरी झोपाळ्यावर स्टंट करताना झोपाळ्याच्या हूकमध्ये गळ्यातील टाय अडकल्याने गळफास बसून 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गुजरातच्या वडोदरा येथील नवापुरा भागात रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. रचित पटेल असे मयत मुलाचे नाव आहे.

रचितची आई शेजारी गेली होती, तर वडील दुसऱ्या खोलीत होते. रचित नेहमीप्रमाणे घरातील झोपाळ्यावर स्टंट करत होता. मात्र हाच स्टंट त्याच्या जीवावर बेतला. स्टंट करताना रचितच्या गळ्यातील टाय झोपाळ्याच्या हूकमध्ये अडकली.

वडिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी बेशुद्धावस्थेत त्याला खाली उतरवून मांजलपूर येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.