
नवी मुंबईतील घणसोली परिसरात धावत्या लोकलमध्ये दोन नराधमांनी एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलची गळा आवळून दोघांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ही घटना आत्महत्या अशी दाखवण्यासाठी त्या दोघांनी पोलिसाचा मृतदेह समोरून येणाऱ्या गाडीसमोर फेकला. मात्र समोरून येणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनने हा प्रकार पाहिल्यानंतर तत्काळ त्याबाबत पोलिसांना कळवले. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय रमेश चव्हाण (42) असं हत्या झालेल्या पोलिसाचे नाव असून ते पनवेल रेल्वे पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल होते. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्टेशनच्या मध्ये आढळून आला होता. चव्हाण यांच्या मानेवर व्रण आढळले होते.
































































