
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. पण या महामानवाचा अपमान करण्याचा मस्तवालपणा सत्ताधारी दाखवत आहेत. संविधान आणि डॉ. आंबेडकर यांचा अपमान करणाऱयांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम महाराष्ट्राला करावेच लागेल, अशी तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डागली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संविधानाची प्रत फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवून शिवसैनिकांनी वाजत गाजत दिंडी काढली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनात राष्ट्रध्वजाला वंदन करून भारतमातेची प्रतिमा आणि संविधानाचे पूजन करण्यात आले.