ट्रेडमार्कचा वाद सामंजस्याने सोडवा, अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांना हायकोर्टाचा सल्ला

रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनी म्हणून ओळख असलेल्या ‘लोढा ग्रुप’चे मालक अभिषेक यांनी ट्रेडमार्क प्रकरणी भाऊ अभिनंदनविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने याचिकेची आज दखल घेत दोन्ही भावांनी ट्रेडमार्पचा वाद सामंजस्याने सोडवावा असा सल्ला दिला.

‘लोढा’ नाव वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी करत अभिषेक यांनी भाऊ अभिनंदनविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सोमवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने सांगितले की, वाद प्रामुख्याने दोन भावांमध्ये असल्याने, दोघा भावांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी हा दोन भावांमधील वाद असल्याचे दिसून येते. हा वाद सोडवण्याचा काही प्रयत्न झाला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने उपस्थित दोन्ही पक्षकारांना केली. तसेच याचिकाकर्ते व प्रतिवाद्यांना मध्यस्थी करून हे प्रकरण सोडवायचे असल्यास त्याबाबत मंगळवारी कळवण्यास सांगितले. जर दोन्ही पक्षकार सहमत असतील तर माजी मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली जाईल व शक्य तितक्या लवकर कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे न्यायालय म्हणाले.