
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निविदा न काढताच मे. हितेन सेठी अॅण्ड असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी करण्यात आली आहे. या कंपनीकडून रंगायतनचा मेकओव्हर करण्यासाठी 21 लाखांचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान ठाणे महापालिकेच्या वशिला नाट्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रंगायतनची इमारत साधारणतः 40 वर्षांपूर्वीची जुनी इमारत आहे. गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी तब्बल 23.50 कोटी निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. इमारतीची दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यासाठी पालिकेवरील सल्लागार मे. हितेन सेठी अॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या कामाकरिता मे. हितन सेठी अॅण्ड असोसिएट्स यांना कामाचा एकूण खर्च 21 लाख 59 हजार इतका आहे. मात्र ही नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नाही.
कामाचे नकाशे, आराखडे व अंदाजे खर्च तयार
अस्तित्वातील इमारतीचा व परिसराचा सर्व्हे करणे, तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना सुचवणे, अस्तित्वातील वास्तूला धोका न पोहोचता इमारतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे व त्यासाठी लागणाऱ्या कामांचे अंदाजखर्च बनवणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. त्याअनुषंगाने नूतनीकरण करावयाच्या कामाचे नकाशे, आराखडे व अंदाजखर्च तयार केले आहेत.
मिंध्यांच्या जवळच्या व्यक्तीने केली शिफारस
मिंध्यांच्या जवळच्या व्यक्तीने मे. हितेन सेठी अॅण्ड असोसिएट्स या सल्लागाराची शिफारस केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निविदा न काढता नियुक्ती करण्यात आली असून याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी अनेक कामांमध्ये अशाच प्रकारे सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याने पालिकेच्या कारभारावर शंका निर्माण केली जात आहे.



























































