पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा अजब निकाल

लग्नानंतर पत्नीच्या संमतीशिवाय नवऱ्याने पत्नीसोबत केलेले अनैसर्गिक कृत्य हे गुन्हा ठरत नाही, असा अजब निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथील रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्याने 11 डिसेंबर 2017 च्या रात्री पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले होते. नवऱ्याच्या या कृत्यामुळे तिला प्रचंड वेदना झाल्या. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

सासरच्या मंडळीने नवऱ्याविरोधात कलम 304, 376 आणि 377 अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु, या सर्व आरोपातून उच्च न्यायालयाने पतीची निर्दोष मुक्तता केली असून पतीची तुरुंगातून तात्काळ सुटका करावी असे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे याचिकाकर्त्या पतीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने संमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा झाल्याचा दाखला देत नाही. संमतीने लैंगिक संबंधांच्या बाबतीत भादंविकलम 377 अन्वये गुन्हा दाखल होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

आधी दोषी, आता सुटका
पत्नीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने पतीला कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक कृत्य), 376 (बलात्कार) आणि 304 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले. तसेच त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात पतीच्या बाजुने कोर्टाने निकाल दिला आहे.

काय आहे प्रकरण
सबंधित खटल्याच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने म्हटले की, जर पत्नीचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसेल तर पतीने केलेले कोणतेही लैंगिक संबंध किंवा कृत्य बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत पत्नीची संमती अप्रासंगिक ठरते आणि त्यामुळे अपीलकर्ता पती आयपीसीच्या कलम 376 आणि 377 अन्वये गुन्हा करत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. त्याचप्रमाणे कनिष्ठ न्यायालयाने आयपीसीच्या कलम 304 अन्वये कोणताही विशिष्ट निष्कर्ष नोंदवलेला नाही.