
मंत्रालयात मुख्य इमारतीच्या व्हीव्हीआयपी गेटसमोरील भंगार सामान आणि राडारोडा हटवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेटसमोरील परिसर मोकळा होऊ लागला आहे. या संदर्भात दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत तातडीने साफसफाई सुरु झाली आहे.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीपासून विस्तारित इमारतीमध्ये सर्वत्र कचऱ्याचे आणि भंगार सामानाचे ढीग पडले आहेत. त्यामुळे मंत्रालयाची रयाच गेली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मंत्रालय झाले भंगारालय’ असे वृत्त दै.‘ सामना’मध्ये 11 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची मंत्रालय प्रशासनाने तातडीने दखल घेतली आणि व्हीव्हीआयपी गेटसमोरील भंगार आणि राडारोडा हटवण्यास सुरुवात केली आहे. आज दुपारी दोन ट्रकमध्ये भरून भंगार सामान आणि कचरा उचलून मंत्रालयाच्या बाहेर नेण्यात आला. मंत्रालयाच्या दर्शनी भागात प्रचंड प्रमाणावर जुने लाकडी फर्निचर, फायलींचे ढिगारे, तुटलेले प्लाय गोण्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत. हे सर्व सामान उचलून नेण्यास सुरुवात झाली.