हातापायात पुन्हा बेड्या, शीखांच्या पगड्या उतरवल्या; घुसखोरांचे विमान आले, ट्रम्प यांची मोदी गळाभेट घेत होते तेव्हा 116 स्थलांतरितांना विमानात डांबले

अमेरिकेतील बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरितांचे विमान अखेर शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अमृतसर विमानतळावर उतरले. स्थलांतरितांना दिलेल्या वागणुकीवरून विरोधकांकडून रान उठवूनही आणि जगभरातून प्रचंड टीका होऊनही आज पुन्हा त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड होते. तर सुरक्षेचे कारण देत शीख बांधवांच्या पगड्याही उतरवण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट घेत होते तेव्हा 116 हिंदुस्थानी स्थलांतरितांना विमानात डांबण्यात आले. मात्र, मोदींनी ट्रम्प यांना याप्रकरणी पुठल्याही प्रकारचा जाब विचारला नाही, अशी टीका आता पुन्हा सोशल मीडियातून होऊ लागली आहे.

112 बेकायदा स्थलांतरितांची तिसरी तुकडी हिंदुस्थानात

अमेरिकन लष्कराच्या विमानातून 112 बेकायदा स्थलांतरितांची तिसरी तुकडी आज रात्री अमृतसर विमानतळावर दाखल झाली. यात 44 हरयाणाचे. 33 गुजरात, 31 पंजाब तर उत्तर प्रदेशचे 2 आणि उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेशच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या बेकायदा स्थलांतरितांपासून पंजाबमधील तरुणांनी धडा घ्यावा, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे.

मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा होऊनही पुन्हा तीच वागणूक

हिंदुस्थानी स्थलांतरितांची पाठवणी करताना त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड होते. याप्रकरणी ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होऊनही बेकायदा स्थलांतरितांना पुन्हा तीच वागणूक मिळाली.

हत्या प्रकरणातील वॉण्टेड आरोपीला अटक

बेकायदा स्थलांतरित अमृतसर विमानतळावर उतरता हत्येप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. साहिल वर्मा असे या आरोपीचे नाव आहे.