‘रमाधाम’मधील आजी-आजोबांवर अद्ययावत उपचार; डायलिसिस, मणक्याचे विकार, गुडघेदुखीचे टेन्शन संपणार

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रमाधाम वृद्धाश्रमातील आजी-आजोबांवर आता अद्ययावत उपचार होणार आहेत. रमाधामचे विश्वस्त चंदुमामा वैद्य यांच्या प्रयत्नाने मायको सर्क्युलेशनवर आधारित उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे डायलिसिस, गँगरीन, मणक्याचे विकार तसेच गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या आजी-आजोबांना दिलासा मिळणार आहे.

महिला दिनानिमित्त रमाधामचे अध्यक्ष  चंदुमामा वैद्य यांच्या हस्ते आश्रमातील वृद्ध महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. विवेक बेंडाळे, राकेश बेंडाळे, निरामय बेंडाळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना चंदुमामा वैद्य यांनी वृद्धाश्रमात मायको सर्क्युलेशनवर आधारित उपचार पद्धती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये येथील आजी-आजोबांबरोबरच अन्य गरजूंवरदेखील उपचार केले जातील. डायलिसिस, गँगरीन न्युरोपॅथी, स्लीप डिक्स, स्पाँडेलिसिस, व्हेरीकोज व्हेनस, अल्सर, गुडघेदुखी, गतिमंद, दिव्यांग रुग्णांवरही उपचार होणार आहेत. सहा महिन्यांपासून ते 100 वर्षांपर्यंतच्या रुग्णांना याचा लाभ घेता येणार असून रमाधाममध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही  चंदुमामा वैद्य यांनी दिली. संपर्क – 9820060132, 9324544392, 7021317358.