
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील जय आरोग्य रुग्णालय ग्रुपच्या कमलराजा रुग्णालयात रविवारी रात्री अचानक भीषण आग लागली. स्त्रीरोग विभागाच्या आयसीयूमध्ये आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली. यावेळी वॉर्डबॉयने तत्परता दाखवल्याने 22 जणांचे प्राण वाचले. वॉर्डबॉय या रुग्णांसाठी अक्षरशः देवदूत ठरला.
आयसीयू आणि आसपासच्या वॉर्डमध्ये 22 रुग्ण होते. सुमारे 100 रुग्ण लेबर रुममध्ये आणि 50 रुग्ण पीडियाट्रिक्स वॉर्डमध्ये होते. यावेळी वॉर्डबॉयनी तत्परता दाखवत वॉर्डच्या खिडक्यांच्या ग्रिल तोडून व्हेंटिलेशनची व्यवस्था केली आणि काचा फोडत रुग्णांना बाहेर काढले. आगीनंतर रुग्णालय धुराने भरलं होतं, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण होतं.
रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वॉर्ड बॉयनी रुग्णांना ताबडतोब सुरक्षित सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. परिस्थिती बिकट झाल्याचे दिसल्यानंतर वॉर्डच्या खिडक्यांच्या ग्रिल तोडून व्हेंटिलेशनची व्यवस्था करण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
            
		





































    
    





















