वरळीतून थेट मरीन ड्राइव्ह; कोस्टल रोडचा वरळीतील भूमिगत मार्ग मेच्या पहिल्या आठवड्यात खुला होणार

कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू झाला असला तरी वरळीतून थेट मरीन ड्राइव्हला जाण्यासाठी 60 मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाचे काम अपूर्ण होते. हे काम आता पूर्ण झाले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हा मार्गही खुला होणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राइव्हला प्रवास करणे आता अधिक सुकर होणार आहे.

मुंबई महापालिकेने 14 हजार कोटी खर्च करून प्रिंन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 कि.मी. लांबीचा कोस्टल रोड बांधला आहे. या रोडच्या बांधकामात दोन महाकाय बोगदे 70 मीटर जमिनीखाली खोदले आहेत. यातील एक बोगदा 12 मार्च 2024ला वरळी ते मरीन ड्राइव्ह प्रवासासाठी सुरू केला, तर मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा मार्ग जून 2024ला सुरू करण्यात आला.

बडोदा पॅलेस ते हाजी अली एलिव्हेटेड मार्गाचे काम सुरू

कोस्टल रोडवरील शेवटच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग बडोदा पॅलेस ते हाजी अली असा असणार आहे. हा उन्नत मार्ग पूर्ण झाला की कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

कनेक्टरची रखडपट्टी

एमएमआरडीएच्या माध्यमातून शिवडी ते वरळी दरम्यान कनेक्टर बांधण्यात येत आहे. मात्र त्यासाठी प्रभादेवीचा पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याआधी स्थानिक रहिवाशांना योग्य पर्याय द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला विरोध केला आहे. त्यामुळे कनेक्टरच्या कामाची आणखी रखडपट्टी होणार आहे.

कोस्टल रोड-अटल सेतू जोडले जाणार

वरळीत तयार करण्यात आलेला 60 मीटर लांबीचा भूमिगत मार्ग हा वरळीतून मरीन ड्राइव्ह येथे जाण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. पण हाच भुयारी मार्ग अटल सेतूला जोडण्यात येणाऱया कनेक्टरलाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे वरळीतून थेट नवी मुंबईत जाण्यासाठीही हा भुयारी मार्ग उपयोगी ठरणार आहे. सध्या या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी त्याची रंगरंगोटी तसेच इतर कामे व्हायची आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.