
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस खात्यात अनेक बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील पाच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची मत्स्य विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक कृष्णा सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. शुभम गुप्ता सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे या पदावर करण्यात आली आहे. तर पुलकित सिंग, सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद या पदावर करण्यात आली आहे.