
वसईच्या कामण येथे कंपनीत सुरू असलेला एमडी ड्रग बनवण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. जप्त केलेल्या एमडी ड्रगची किंमत सुमारे 8 कोटी रुपये इतकी आहे. एमडी ड्रग प्रकरणी पोलिसांनी सादिक शेख आणि सिराज पंजवानीला अटक केली.
एमडी ड्रग विक्रीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. गेल्या आठवडय़ात साकीनाका पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथकाला गस्तीदरम्यान सादिककडून 53 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करत त्याला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याला ते एमडी सिराज पुरवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या पथकाने मिरा रोड परिसरात सापळा रचला. सापळा रचून सिराजला ताब्यात घेतले. त्याला काळुराम चौधरी हा एमडी देत असल्याचे त्याने सांगितले. काळुराम चालवत असलेल्या एका पंपनीत पोलिसांनी छापा टाकून एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला. घटनास्थळाहून पोलिसांनी 4 किलो वजनाचे एमडी जप्त केले.