
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. येत्या दिवाळीत मुंबईतील सुमारे 5 हजार घरांसाठी लॉटरी काढण्याचे आमचे नियोजन आहे, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी दिली. मात्र ही घरे कुठे असणार आणि त्याच्या किमती काय असणार याकडे आतापासूनच सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत.
मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी म्हाडाने आनंदाची बातमी दिली आहे.
गेल्या दीड वर्षात म्हाडाने राज्यभरातील सुमारे 30 हजार घरांच्या विक्रीसाठी 13 लॉटरी काढल्या आहेत. त्यात मुंबईतील 6 हजारांहून अधिक घरांचा समावेश होता. अर्जदारांची सर्वाधिक पसंती ही मुंबईतील घरांना मिळते. घरांसाठी लाखोंच्यावर अर्ज येतात. म्हाडाच्या घोषणेने मुंबईकरांना आणखी एक सुवर्णसंधी मिळाली आहे.
वर्षभरात 19 हजार घरे उभारणार
म्हाडाच्या 2025-2026 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत 19 हजार 497 घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 5199 तर कोकण मंडळाअंतर्गत 9902 घरांची उभारणी प्रस्तावित आहे. त्यासाठी अनुक्रमे 5749.49 आणि 1408.85 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
म्हाडाने घरांसाठी यंदा 9202.76 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
बीडीडीवासीयांना 15 दिवसांत घरे मिळणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 556 कुटुंबीयांना मार्च अखेरीस घराच्या चाव्या मिळणार होत्या, मात्र एप्रिल महिना संपत आला तरी त्यांना घराच्या चाव्या मिळाल्या नाहीत. याबाबत संजीव जयस्वाल म्हणाले, आमच्या बिल्डिंग तयार आहेत, पण त्यात एक तांत्रिक समस्या होती.
पालिकेने आमच्याकडून एलयूसी (लँड अंडर कन्स्ट्रक्शन) टॅक्सची मागणी केली. हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या टॅक्समधून सूट मिळावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार त्यांनी पालिका आयुक्तांना तोडगा काढण्यासंबंधी सूचना केली. पालिका आयुक्तांनीदेखील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटताच आम्ही या इमारतींना अग्निशमन दलाची एनओसी आणि ओसी मिळवून साधारण 15 मेपर्यंत रहिवाशांना घराच्या चाव्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.