
निवडणुका जिंकण्यासाठी भाजप व मिंध्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मते मिळवली. त्या जोरावर सरकारदेखील स्थापन केले. पण ज्या बहिणींनी मते दिली त्याच लाडक्या बहिणींना घोटभर पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत आहे. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील पन्हळघर या आदिवासी वाडीमध्ये सर्वत्र हेच चित्र सध्या दिसत आहे. डोईवर हंडा घेऊन माता-भगिनींना पाण्यासाठी भरउन्हात वणवण फिरावे लागत असून हेच का लाडक्या बहिणींवरील प्रेम, असा सवाल विचारण्यात येत आहे.
पन्हळघर ही डोंगराच्या कुशीत वसलेली आदिवासी वाडी असून उन्हाळा आला की येथील ग्रामस्थांच्या अंगावर काटा येतो. पाण्याकरिता आपले सर्वस्व पणाला लावावे लागते. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात खड्डा खणून त्यात साठलेले पाणी भरण्याची वेळ येथील आदिवासींवर आली आहे. पावसाळ्यातील चार महिने संपले की, उरलेले सर्व दिवस पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर दूरवर जावे लागते. पन्हळघरमध्ये दोनशेहून अधिक लोकवस्ती असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण फक्त पाण्यासाठी रोज लढत आहेत.
विभागाचे धरण आहे. पण या धरणातील पाण्याचा एक थेंबही वाडीत राहणाऱ्या आदिवासींना मिळालेला नाही.
गावाजवळच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्रज्ञ विद्यापीठ आहे. तेथेदेखील मुबलक प्रमाणात पाणी असून आदिवासी वाडी मात्र तहानलेली आहे. खड्ड्यातील दूषित पाणी प्यायल्यामुळे लहान मुले व वृद्ध यांना पोटाचे विकार जडले असून औषधपाणी करायलादेखील आदिवासींकडे पैसे नाहीत.
केवळ पाच किलोमीटर अंतरावर महामार्ग
माणगाव तालुक्यातील पन्हळघर ही आदिवासी वाडी मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. पण त्यांच्या नशिबी थेंबभर पाण्यासाठी वणवण आली असून हाच का विकास, असा संतप्त सवाल आदिवासींनी केला आहे. सरकारने अनेक पाणी योजना आणल्या. डोंगर, दऱ्यांमध्ये तसेच वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांना मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घोटभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींना कोसभर करावी लागणारी फरफट थांबणार तरी केव्हा, असा आर्त प्रश्न विचारण्यात आला आहे.