ठसा – मधुकर झेंडे

>> प्रज्ञा सदावर्ते

आपल्या शहराचा गौरवशाली इतिहास काळाच्या ओघात हरवू नये, नव्या पिढय़ांपर्यंत तो पोहोचावा या भावनेतून इथल्या मातीवर प्रेम करणारी माणसं भरभरून बोलत असतात. असेच होते नाशिकच्या सांस्कृतिक जीवनाशी समरस झालेले आणि येथील खडान्खडा माहिती असलेले, सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे. नाशिक नगर पालिकेत 1955 मध्ये ते मुकादम म्हणून रूजू झाले. आपल्या कर्तृत्वाने जनसंपर्क अधिकारी पदापर्यंत पोहोचले. नगर पालिकेतील पहिले स्वागत अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही पुढील 10 वर्षे ते मानद अधिकारी पदावर होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जलतरण तलावाचे ते पहिले व्यवस्थापक होते. महाकवी कालिदास कलामंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न केले. नाशिक नगर पालिका ते महापालिका हे स्थित्यंतर, त्याचबरोबर शहराच्या अनेक दशकांच्या सांस्कृतिक जीवनाचे ते साक्षीदार राहिले. अफाट जनसंपर्काचे धनी असलेल्या मधुकर झेंडे यांनी सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांशीच स्नेहभाव जपला. नाटक, साहित्याची आवड जोपासत या क्षेत्रातील चळवळींना पाठबळ दिले. नाटक आणि चित्रपटांतून छोटय़ा भूमिकाही केल्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, नाटककार वसंतराव कानेटकर यांचे आशीर्वाद त्यांना लाभले. कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाकडून प्रेरणा घेत सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीत योगदान दिले. त्यांच्या लोकरंजन कला केंद्राच्या ‘तो स्वप्नपक्षी’ नाटकाने नाशिकचे नाव महाराष्ट्रात गाजवले. सन 1961मध्ये शाहीर गजाभाऊ बेणी व मित्र परिवाराच्या सहकार्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दीनानाथ मंगेशकर यांचा अर्धपुतळा उभारला होता. सुरेल कला केंद्राच्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कुटुंबीयांशी त्यांची ओळख झाली आणि ते जिव्हाळ्याचे नाते त्यांनी कायम जपले. शालेय जीवनात मोहन तालमीकडून त्यांनी कुस्त्यांचे फड जिंकले. पुढे आयुष्यभर नाशिकवर नितांत प्रेम केले. ‘चौकांचा इतिहास’ या पुस्तकातून येथील भारावून टाकणारा इतिहास मांडला. यात चौकांच्या आठवणी आहेतच, त्याचबरोबर तिथे वास्तव्यं केलेली मोठी माणसं, त्या भागातील महत्त्वाच्या घटना, घाट, मंदिर, वास्तू यांचीही माहिती दिली. ‘दीपस्तंभ’ आणि ‘गुण गाईन आवडी’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली. साहित्य क्षेत्रातील थोरामोठय़ांचा सहवास लाभल्याने ते शहराचे वैभव असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेशी जोडले गेले. सामान्य कार्यकर्ता ते अध्यक्ष या तब्बल 40 हून अधिक वर्षांच्या वाटचालीत संस्थेच्या प्रगतीत मोठे योगदान दिले. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्षपद आणि वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्षपदही भूषवले होते. नाशिकला झालेल्या 78 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रम समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. शहरातील लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ‘नॅब’सह अनेक संस्थांसाठी कार्य केले. शहराचा इतिहास पुढच्या पिढीने वाचला पाहिजे या भावनेतून प्रयत्न करीत नाशिकचा चालता बोलता संदर्भकोष ही ओळख त्यांनी शेवटपर्यंत सार्थ ठरवली.