कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह शेतकऱयांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने आज अकोला, अमरावती, बुलढाण्यात भव्य ट्रक्टर मोर्चांद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक देत या मुद्दय़ाकडे सरकारचे लक्ष वेधले. डोक्याला भगवे पटके बांधून आणि हाती भगवे झेंडे घेऊन हजारो शेतकरी, त्यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिक रणरणत्या उन्हात या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह शिदोरी घेऊन या मोर्चांमध्ये उतरले होते. यावेळी गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने आर्थिक नुकसान होऊन शेतकऱयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे कंटाळून राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही महायुती सरकारला पाझर फुटलेला नाही. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देणाऱया महायुतीला सत्तेवर येताच या आश्वासनाचा विसर पडला. या फसवणुकीबद्दल शेतकऱयांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी शिवसेनेने आज ट्रक्टर मोर्चे काढले.

देवाभाऊ, कधी करता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा?

अमरावतीमध्ये गाडगे नगरातील संत गाडगे महाराज मंदिर येथून आज सकाळी ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. ‘देवाभाऊ, कधी करता शेतकऱयांचा सातबारा कोरा?’ असा जाब विचारणारे हार्ंडग शेतकऱयांनी ट्रक्टरवर लावले होते. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्यासह जिल्हाप्रमुख पराग गुडधे आणि नरेंद्र पडोळे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तिथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात शेतकरी आणि शिवसैनिकांसह शिवसेनेचे आमदार, उपनेते, माजी खासदार, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, कामगार सेना आणि सहकार सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

शेतकऱयांचा अंत पाहू नका – नितीन देशमुख

महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱयांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु सत्तेवर येताच त्यांना अन्नदात्याचा विसर पडला, असा जोरदार हल्ला यावेळी शिवसेना उपनेते, आमदार नितीन देशमुख यांनी केला. सरकारने संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, केंद्र सरकारकडून विशेष निधी आणून शेतकऱयांना कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

200 ट्रक्टर्ससह हजारो शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार

बुलढाणा येथे दुपारी अडीच वाजता ट्रक्टर मोर्चाला सुरुवात झाली. बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या राष्ट्रमाता जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल परिसरातून शेतकऱयांचे सुमारे 200 ट्रक्टर्स घेऊन हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. प्रत्येक ट्रक्टरवर शिवसेनेचे भगवे झेंडे फडकत असल्याने बुलढाणा शहरातील वातावरणच भगवेमय झाले होते. या मोर्चात शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व वसंत भोजने, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱहाडे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे मोहम्मद सोफियान आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

अकोल्यातील 700 गावांतील शेतकरी मोर्चात

अकोला जिह्यातही शिवसेनेने भव्य ट्रक्टर मोर्चा काढून सरकारचे शेतकऱयांच्या कर्जमाफीकडे लक्ष वेधले. 700 गावांमधील हजारो शेतकरी आणि शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावरून ट्रक्टर मोर्चाला सुरुवात झाली. तिथून टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, गांधी रोड, पंचायत समितीमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय शिदोरी घेऊन आणि डोक्याला गमछे बांधून या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी आपली शिदोरी उघडून जेवण केले.

…हे लोण उद्या महाराष्ट्रात पसरेल – अरविंद सावंत

शेतकऱयांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. कारण तसे आश्वासन सत्ताधारी महायुतीने दिले होते. त्याचबरोबरच पीक विमा योजना सुरू करावी आणि विम्याचे पैसे शेतकऱयांना मिळालेले नाहीत ते आधी सरकारने द्यावेत, असे अरविंद सावंत यावेळी म्हणाले. ट्रक्टर मोर्चांना आजपासून सुरुवात झाली असून आता हे लोण उद्या महाराष्ट्रात पसरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव साहेबांनी दिले… महायुतीने हिरावले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होताच शेतकरी कर्जमाफीचा पहिला निर्णय घेतला. शेतकऱयांना बिनशर्त दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती. महायुती सरकारने मात्र शेतकऱयांची फसवणूक केली. निवडणुकीपूर्वी आश्वासन देऊनही ते पाळले नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी तर कर्जमाफीला नकार देतानाच कर्ज वसुलीचेही आदेश देऊन बळीराजाचा विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया यावेळी संतप्त शेतकऱयांनी व्यक्त केली.