
>> डॉ. संपदा कुलकर्णी
अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचा डॉ.वंदना बोकील- कुलकर्णी संपादित हा संग्रह दोन विदुषींच्या प्रातिभ्याचे दर्शन घडवतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत पुस्तक सतत काही ना काहीतरी, वाचकाच्या हाताला धरून अतिशय मायेने, प्रेमाने शिकवत आहे. हे शिकवणे कधीही बोजड वाटत नाही. हे या पुस्तकाचे पहिले वैशिष्टय़.
मुखपृष्ठावरचा अतिशय साधा सुटसुटीतपणा ते मलपृष्ठावर संपादिका डॉ. वंदना बोकील यांनी अरुणाताई या लेखिकेविषयी लिहिलेले सार्थ शब्द भावतात. विशेषत त्यांच्या लेखनाचा समजुतीचा, समजून घेण्याचा आणि समजून देण्याचाही सूर आहे. ती खरे तर आजच्या काळाची गरज आहे.
या कथासंग्रहात एकूण 19 कथा आहेत. ‘कृष्णकिनारा, अज्ञात झऱयावर रात्री’, ‘उंच वाढलेल्या गवताखाली’, ‘मन केले ग्वाही’ आणि ‘पावसानंतरचं ऊन’ या ढेरे यांच्या पाच संग्रहांतील साठपेक्षा अधिक कथांमधून त्या निवडल्या आहेत. शिवाय ‘सीतेची गोष्ट’ आणि ‘निरंजनेच्या तीरावर’ या दोन यापूर्वी कोणत्याच संग्रहात न आलेल्या कथांचा समावेश त्यात केला आहे. यापैकी ‘सीतेची गोष्ट’विषयी डॉ. वंदना बोकील यांचे अभिवाचनाचे प्रयोग सातत्याने होत असल्याचे वाचण्यात आले होते. म्हणून त्या गोष्टीची उत्सुकता होतीच, पण या गोष्टीसोबतच ‘कुंती’, ‘मायलेकी’, ‘महादेवी’, ‘निरंजनेच्या तीरावर’, ‘पैल तो गे काकू कोकताहे’, ‘पूजा’ या सगळ्याच कथा वाचकाला खिळवून ठेवणाऱया आहेत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रत्येक कथेविषयी संपादिकेनेचे लिहिलेले आहे ते अतिशय सखोल, उच्च दर्जाचे असण्यासोबतच एकाच वेळी समाधान देणारे आणि उत्सुकता निर्माण करणारेही आहे, आणि त्या समाधानातच वाचक प्रत्येक कथेचा आस्वाद घेत जातो.
साधारणत 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1984 पासून अरुणा ढेरे कथालेखन करत आल्या आहेत. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे जुन्याचा नवा पैलू त्या सातत्याने दाखवत असतात. एवढेच नव्हे, तर कोणत्याही विषयाची नवी दृष्टी त्या वाचकांसमोर ठेवत असतात. प्राचीन व्यक्तिरेखांचे पुनर्निर्माण हे अरुणाताईंच्या लेखनाचे महत्त्वाचे मर्म या कथासंग्रहात आपल्याला ठायी ठायी सापडते. पुराण कथांसोबतच समकालीन वास्तवाचे दर्शन घडवणारे त्यांच्या कथांचे अनुभव विश्व सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचेही आहे. साधेपणा, संयम आणि समतोल दृष्टी या कथांमधून दिसते. शांत रसाचा अनुभव वाचकाला मिळतो. त्यातील कोणतेही पात्र कधीही आपल्या नशिबाविषयी, इतर पात्रांविषयी परिस्थितीविषयी आगपाखड करताना, आत्महत्येचा किंवा विनाशकारी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत नाही, पण त्याच वेळी ही पात्रे मूकपणे काहीही सहन करत नाहीत. एका प्रगल्भतेने आणि परिपक्वतेने व्यक्त होतात हे या पात्रांचे वैशिष्टय़ आहे. यातील अनेक कथांत स्त्राr केंद्रस्थानी आहे, तिच्यात विविधता आहे, आणि ही भिन्नता स्वभावाची, गुणांची जशी आहे तशी त्यांच्या परिस्थितीचीही आहे. त्यांच्या अवतीभोवती वावरणारी पुरुष पात्रे हीदेखील वैशिष्टय़पूर्ण आहेत. ती संवेदनशील, स्त्रियांना समजून घेणारी आहेत.
समकालीन वाङ्मयीन पर्यावरण चित्रित करणाऱया कथा लक्षवेधी आहेत. साहित्य व्यवहार, संशोधनातील आव्हाने, लेखक, प्रकाशक संशोधक, मार्गदर्शक इत्यादी नाती त्यातून प्रकटतात. मायलेकी, मैत्रिणी, प्रेयसी-प्रियकर, पती-पत्नी, आजी-नात, दोन मित्र अशी इतरही अनेक नाती त्यातील गुंत्यांसह दिसतात. या सगळ्यांमधले सूक्ष्म पदर अरुणा ढेरे सहजपणे उलगडतात. या पात्रांना प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक निरनिराळ्या तऱहेने होते. पात्रांची स्वप्ने आहेत, त्यांच्या मनीषा आहेत, ती महत्त्वाकांक्षी आहेत, पण ती पेटून उठत नाहीत. ती भवताल समजून घेतात आणि निराश न होता समजुतीने जगतात. ‘बांडगूळ’, ‘प्राक्तन’, ‘धुकं’, ‘अज्ञात झऱयावर रात्री’, ‘ओळख’, ‘एका बाजूला उभे राहून’ आणि ‘उभं राहताना’ कथांतून समकालीन वास्तवाचे दर्शन होते. विचित्र परिस्थिती, नियतीचे खेळ, दुःख आहे. काही वेळा काही पात्रे अस्वस्थ होतात. मात्र स्वीकृती हा जणू त्यांचा स्थायीभाव आहे. असा स्वीकृतीचा अनुभव सगळ्याच कथांमधून येतो. लेखिकेची चिंतनशीलता, प्रगल्भ आकलन हे सगळ्याच कथांतून जाणवते. कुंती, द्रौपदी, मेनका, शकुंतला, सीता, वसुमाई, महादेवी, अरुंधती, पुष्पावती, शिवाय समकालीन कथांतील मालिनी, ऋता, देविका इत्यादी अनेक जणी… लेखिका खरेच या पात्रांना भेटली की काय? असा प्रश्न पडतो.
कथांमधील वातावरण निर्मिती अतिशय समर्पक आहे. उदा. ‘पुन्हा भेटताना’मधील चाळीतले दोन खोल्यांचे घर, ‘मायलेक’मधील मेनकेचा महाल, तिचे स्नानगृह, ‘सीतेची गोष्ट’ आणि ‘मायलेकी’मधील आश्रमांचे वातावरण लेखनाची शैली संपादिकेने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे अतिशय वेल्हाळ आहे. खरे तर या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच या पुस्तकातील कथांचे संपूर्ण समीक्षण अतिशय मार्मिकपणे आले आहे. मलपृष्ठावर तर संपादिकेने आपल्याला या सगळ्या कथांचा आणि अरुणा ढेरे यांच्या लेखनाचा बाज समजावून सांगितला आहे.
अशा प्रकारचे ‘निवडक’ संपादन ही एखाद्या लेखकाच्या समग्र अभ्यासाची संधी असते ही संपादक बोकील-कुलकर्णी यांची भूमिका नम्र आहे. “निवड करताना कितीही वस्तुनिष्ठ असावी वाटले तरी त्यावर वैयक्तिक आवडीचा प्रभाव नकळत पडत असतो’’ असे त्यांनी म्हटले आहे ते पटण्यासारखे आहे. त्यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या ‘समजुतीच्या काठाशी’ या दीर्घ प्रस्तावनेत अरुणा ढेरे यांच्या समग्र कथासाहित्याची चिकित्सा केली आहे. उत्तम संपादन हे केवळ संकलन नसते याची जाणीव देणारी आहे. बऱयाच काळाने पुन्हा समोर आलेल्या अरुणा ढेरे यांच्या या कथांतून सकस वाचल्याचा अनुभव पदरात पडतो.
(लेखिका मराठीच्या प्राध्यापक आहेत.)