भटकंती – मिनिएचर पुस्तकांचे म्युझियम

>> जयप्रकाश प्रधान

झरिफा या अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे प्रदर्शन थाटले आहे. आगळ्यावेगळ्या आणि जगातील एकमेव मिनिएचर म्युझियमने जागतिक पातळीवरील अनेक पारितोषिके मिळवत 2015 मध्येगिनीज बुक आाफ वर्ल्ड रेकार्डस्मध्ये नोंद झाली आहे.

‘मिनिएचर’ (छोट्यात छोटी) पुस्तकांचे जगातील पहिले आणि एकमेव असे म्युझियम, युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडांना जोडणाऱ्या ‘अझरबैजान’ या देशात पाहावयास मिळते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये 2015 मध्ये त्याची नोंद झाली आहे. राजधानीच्या बाकू शहरातील जुन्या इचेरी शहरात हे म्युझियम थाटण्यात आले आहे. बाकूच्या भटकंतीत म्युझियमच्या निर्मात्या सालाखोव्हा झरिफा तेयमूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

एका अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे प्रदर्शन थाटले आहे. झरिफा या अझरबैजान देशात सांस्कृतिक क्षेत्रात सन्माननीय कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलेच्या आयुष्याला 1982 मध्ये मोठी कलाटणी मिळाली. त्या नोव्हेंबर 1982 ला मॉस्को येथे पुस्तकप्रेमींच्या भरलेल्या ‘ऑल युनियन व्हॉलेंटरी सोसायटीच्या’ अधिवेशनाला गेल्या होत्या. तेथे क्रायलोव्ह या नामांकित लेखकाच्या 1935 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दंतकथांच्या संग्रहाची, अगदी छोट्या आकारातील आवृत्ती 23 रुबेल्सना विक्रीसाठी उपलब्ध होती. झरिफा यांनी त्याची खरेदी केली. त्याचे पैसे देऊन त्या ते पुस्तक घेण्यासाठी बाजूच्या गोदामात गेल्या. तेथे त्यांनी आयुष्यात प्रथम, अगदी छोट्या आकाराची ‘मिनी’ पुस्तके पाहिली आणि त्या दिवसापासून अशी पुस्तके जमविण्याचा छंदच त्यांना लागला. दरवर्षी या पुस्तकांची संख्या वाढतेच आहे. त्या म्युझियममध्ये 2002 मध्ये अशा प्रकारच्या मिनिएचर पुस्तकांनी भरलेली काचेची 25 कपाटे होती. आता त्या कपाटांची संख्या 39 झाली असून एकूण 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 मिनिएचर पुस्तके तेथे पाहावयास मिळतात. यात विशेष म्हणजे भारतातील ‘हनुमान चालिसा’ व गीतेची अगदी छोटी आवृत्तीही तेथे आढळली.

मिनिएचर पुस्तकाची व्याख्या काय, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या प्रमाणानुसार 75 * 75 मि.मी.पर्यंतच्या आकाराचे पुस्तक हे मिनिएचर पुस्तक ठरते. झरीफा यांच्या संग्रहालयात अशी 3370 पुस्तके आहेत. पूर्वीच्या सोव्हिएत रशियाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे 100 * 100 मि.मी. पानाच्या आकाराचे पुस्तक ‘मिनिएचर’ सौंधेत बसते. त्या मापनानुसारही अनेक पुस्तके त्यांनी जमविली. म्युझियममधील चार पुस्तके ही सर्वात छोटी म्हणजे अक्षरशः ‘मायक्रो’ आकाराची व अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. त्यात जपानची राजधानी टोकियो येथून प्रसिद्ध झालेल्या ‘टोपान’ (Toppan) पुस्तकाचा आकार 0.75 * 0.75 मि.मी. एवढा आहे. तेथील चार मोसमांतील फुलांचे वर्णन त्यात आहे. ते एका खास आकर्षक बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ‘मायक्रो बुक’ असे त्यावर इंग्रजीत लिहिले आहे. आणखी एक जपानी पुस्तक 2 * 2 मि.मी.चे आणि दोन जर्मन मायक्रो पुस्तकेही येथे पाहावयास मिळतात. त्यापैकी एकाचा आकार 2.0 * 2.9 मि.मी. आणि दुसऱ्याचा 3.5 * 3.5 मि.मी. एवढा आहे. या सर्वांच्या शेजारी जाड भिंग ठेवण्यात आले असून, त्याच्या सहाय्यानेच ती पुस्तके वाचता येतात. या म्युझियमसाठी शिरव्हान शहाज राजवाडय़ाजवळची छोटी, पण मध्यवर्ती जागा शासनाने दिली आणि 23 एप्रिल 2002 मध्ये या म्युझियमचे तिथे उद्घाटन झाले. सालाखोव्हा यांनी उद्घाटनासाठी तो दिवस मुद्दाम निवडला. कारण याच दिवशी 1616 मध्ये जागतिक कीर्तीचा नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे निधन झाले आणि तो दिवस आंतरराष्ट्रीय  पुस्तके आणि पुस्तकांचे हक्क (कॉपी राईट) यासाठी जगभर पाळण्यात यावा असा निर्णय युनेस्कोने घेतला. शेक्सपिअरचे नाव चिरकाल राहावे हा त्या मागचा हेतू होता आणि त्याच दिवशी हा ‘मिनिएचर म्युझियम’ पर्यटक, स्थानिक नागरिक या सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला.

87 वर्षे वयाच्या झरिफा माडम आजही मोठ्या उत्साहाने साऱ्या जगभर विविध बैठका, परिषदांच्या निमित्ताने लंडन, बर्लिन, म्युनिक, ब्रुसेल्स, बीजिंग, पारीस तसेच हवाना, मास्को येथे गेल्या होत्या. तेथील अँटिक पुस्तकांची दुकाने, बाजारपेठांना त्यांनी भेटी दिल्या. मिनिएचर पुस्तकांची माहिती घेऊन त्यांनी ती खरेदी केली. त्याखेरीज अनेक स्नेही, पुस्तकप्रेमी, राजकारणी व्यक्ती यांनी काही मिनी पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. तसेच 1985 पासून त्यांनी मिनिएचर पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले. विशेषतः सोव्हिएत रशियात अशी पुस्तके जमविणारी पुस्तकप्रेमी मंडळी आहेत. त्यांचे खूपच सहाय्य झाले.

हे म्युझियम 145 चौ.मीटर क्षेत्रफळाच्या जागेत थाटण्यात आले असून त्याची रचना अतिशय आखीव अशी आहे. एकूण 39 काचेच्या भव्य कपाटात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. पुस्तकांची वर्गवारी केल्याने कोणत्या कपाटात कोणती पुस्तके आहेत याची कल्पना येते. शेक्सपियरच्या अजरामर साहित्याचा ठेवा येथे पाहावयास मिळतो. ‘रोमियो आण्ड ज्युलिएट’पासून संपूर्ण शेक्सपिअरच्या एकूण 40 खंडांपैकी 24 खंड हे 50*73 मि.मी.च्या आकारात आहेत. झरिफा यांच्या या अगदी आगळ्यावेगळ्या आणि जगातील एकमेव मिनिएचर म्युझियमने जागतिक पातळीवरील अनेक पारितोषिके मिळविलीत. पण सर्वात मोठा सन्मान म्हणजे 2015 मध्ये या म्युझियमची ‘गिनीज बुक आाफ वर्ल्ड रेकार्डस्’मध्ये नोंद झाली आहे. बाकू शहरात इचेरी शहरात असलेले हे मिनिएचर म्युझियम पुस्तकप्रेमींना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असते.