समाजभान- थॅलेसेमियामुक्त अभियान

>> अनिल हर्डीकर

येत्या 8 मे रोजी जगभरात थॅलेसेमिया दिन साजरा केला जाईल. जनुकीय दोषांमुळे होणारा हा आजार आजही असाध्य म्हणावा असा. या आजाराचे उच्चाटन होण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी विलेपार्लेमधील स्वा. सावरकर सेवा केंद्राद्वारे थॅलेसेमियामुक्त विलेपार्ले अभियान राबवले जाते. या उपक्रमाबाबत जाणून घेऊया.

‘आजार झाल्यानंतर औषधपाणी करण्यापेक्षा आजार होणारच नाही याची काळजी घेणं चांगलं, असं म्हणतात. थॅलेसेमियाबद्दल बोलायचं झाल्यास आजार होण्याआधीच काळजी घेणं सोपं आणि आजार झाल्यानंतर उपचार जरी असाध्य नसले तरी क्लेशकारक, घरदार उद्ध्वस्त करणारे असतात असं म्हटलं तर वावगं ठरू नये. येत्या 8 मे रोजी जगभरात थॅलेसेमिया दिन साजरा केला जाईल. मात्र आजही या आजाराबाबत म्हणावी तितकी जागरूकता नाही.

थॅलेसेमिया हा आजार म्हणजे नेमकं काय? आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा, तांबडय़ा पेशी आणि प्लेटलेट्स असतात. रक्ताची सर्व पेशी आणि उतींना ऑक्सिजन पुरवणं, त्यांना उपयुक्त अन्नद्रव्यं पुरवणं, शरीरातील कार्बन डायऑक्साईडसारख्या त्याज्य गोष्टी बाजूला करणं, संसर्गापासून रक्षण करणं अशी अनेक कामं असतात. थॅलेसेमिया असणाऱया रुग्णांमध्ये हिमोग्लोबिन अत्यंत कमी प्रमाणात तयार होतं किंवा होतच नाही. हिमोग्लोबिन हा आपल्या रक्तातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या तांबडय़ा रक्तपेशी हिमोग्लोबिनचाच वापर करून शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पुरवत असतात. त्यामुळे रक्ताच्या सर्वात महत्त्वाच्या  कामासाठी याचं असणं फार आवश्यक आहे. थॅलेसेमिया या  विकारात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्याने हे लोक अॅनिमिक होतात. त्यांना सतत दम लागतो, थकवा येतो, श्वास घेताना त्रास होतो तसंच ते निस्तेज दिसू लागतात. त्यांना तातडीने रक्त पुरवठा न केल्यास मृत्यू अटळ असतो. मुख्य म्हणजे हा असा रक्त पुरवठा दर 15/20 दिवसांनी आयुष्यभर करावा लागतो.

थॅलेसेमिया आजार हा जनुकीय दोषांमुळे होतो. आईवडिलांकडून आलेल्या जनुकांमधून तो होत असल्यामुळे त्याचा परिणाम जन्मत दिसू लागतो. थॅलेसेमियाची लक्षणं बाळाच्या जन्मानंतर अनेकदा लगेच आणि काही वेळा अवधी गेल्यानंतर दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये थॅलेसेमिया होईल असं एखादं जरी जनुक असेल तर त्यांना थॅलेसेमियाचे कॅरियर म्हणजे वाहक असं म्हटलं जातं. अशांना सौम्य अॅनिमिया होऊ शकतो. परंतु अशा वाहकाचे जोडीदारही वाहक असतील तर अशा जोडीच्या अपत्याला थॅलेसेमिया होण्याची शक्यता असते.

थॅलेसेमियावर उपचार म्हणून वेळोवेळी रक्त चढवावं लागतं. त्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण वाढते आणि हृदय, यकृत आणि इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होतो. अशा आजारी माणसाला सकस आहार, योग्य व्यायाम सुचवला जातो आणि व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. या आजारावर बोन मॅरो ट्रान्सप्लान्टचा उपचार केल्याने तो बरा होऊ शकतो. पण तो उपचार खर्चिक असून त्याला यश मिळेलच अशी खात्री देता येत नाही.

विवाह ठरवताना आपल्या देशात जन्मपत्रिका जमतात ना हे पाहण्याची पद्धत आहे. अलीकडे रक्तगटदेखील पाहिले जातात, पण या गोष्टी ठरवून झालेल्या विवाहात. प्रेमात पडल्यानंतर या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. मात्र भावी आयुष्याचा जोडीदार ठरवताना, आपण आपलं आयुष्य सुखाचं व्हावं अशी इच्छा करतोच.

आज जगभरात पसरत चाललेल्या थॅलेसेमिया या विकाराचा आकार पाहता लग्न, मग ते ठरवून केलेलं असो किंवा प्रेमविवाह असो भावी पती-पत्नीने थॅलेसेमिया चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे. ही चाचणी खर्चिक नाही, वेळ खाणारी नाही, वेदनादायी नाही आणि ती रक्त गटासारखी एकदाच करावी लागते. तरुण-तरुणींने आणि त्यांच्या जबाबदार पालकांनी समजून घेणं अत्यावश्यक आहे.

पतीपत्नी दोघांनाही थॅलेसेमिया मायनर असेल तर त्यांनी अपत्याचा विचार करताना डॉक्टरी सल्ला घ्यावा वा अपत्याचा किंवा बाळ दत्तक घेण्याचा विचार करावा. कारण त्यांना होणारं मूल हे थॅलेसेमिया मेजर होण्याची दाट शक्यता असते. शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या ठिकाणी रक्ताची तपासणी करून त्याचे निदान करता येईल. ड्रायव्हिंग लायसन्सवर रक्तगट लिहिलेला असतो त्याप्रमाणे थॅलेसेमिया असेल आणि  त्याचीही नोंद केलेली असेल तर त्याची मदत होईल.

या आजाराच्या जनजागृतीसाठी आणि थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी कार्यरत असणाऱया सुजाता रायकर यांच्या ‘साथ’ या संस्थेविषयी स्वयं टॉक्सच्या माध्यमातून प्रेरणा घेत सुजाता नरसाळे यांच्यासह मी ‘थॅलेसेमियामुक्त विलेपार्ले’  हे अभियान राबवायचं ठरवलं आणि स्वा. सावरकर सेवा  केंद्र ही संस्था पाठीशी उभी राहिली. पूर्व पार्ल्याच्या शाळा, कॉलेजांमधून विद्यार्थ्यांची रक्त चाचणी घेण्यात आली. अनेक लोकांनी आर्थिक मदतीचा हात दिला. जर सर्व तरुण-तरुणींनी वेळीच रक्त चाचणी केली तर थॅलेसेमियावर एकदोन पिढय़ांच्या काळातच नियंत्रण आणू शकू. कालांतराने तो पूर्ण नष्ट करता येईल, असा विश्वास इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केला आहे.

[email protected]