PSL मधून आणखी एका खेळाडूची IPL मध्ये एन्ट्री, पंजाबने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी निवड केलेला मिचेल ओवेन कोण आहे?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जचा संघ यंदा चांगलाच फॉर्मात आहे. 10 पैकी 6 सामने जिंकत पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर विराजमान आहे. पहिल्या विजेतेपदाकडे आगेकूच करत असताना पंजाबला मोठा धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू ग्लेम मॅक्सवेल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला. आता त्याच्या जागी पंजाबने विस्फोटक अष्टपैलू खेळाडू मिचेल ओवेनची निवड केली आहे.

ग्लेन मॅक्सवेलसाठी यंदाचा हंगाम अगदीच थंड राहिला. 7 सामन्यात त्याला फक्त 48 धावा करता आल्या. यापैकी 6 डावात तर त्याला दहाचा आकडाही पार करता आला नाही. कोलकाताविरुद्ध झालेल्या लढतीमध्ये त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. आता त्याच्या जागी पंजाबने मिचेल ओवेन याची संघात निवड केली आहे.

मिचेल ओवेन हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. 2001 मध्ये जन्म झालेल्या मिचेल अष्टपैलू खेळाडू असून बिग बॅश स्पर्धेत तो होबार्ट हुर्रिकेन्स आणि साऊथ आफ्रिका टी-20 लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो बाबर आझमचा संघ पेशावर जाल्मीकडून खेळतो. आता तो आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज आहे.

मिचेल ओवेन याने बिग बॅशमधील 24 लढतीतील 21 डावांमध्ये 531 धावा केलेल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा समावेश आहे, तर दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये त्याने 3 डावात 14 धावा केल्या आहेत. पीएसएलच्या 6 डावात त्याने 101 धावा केल्या आहेत. 108 ही त्याची टी-20 मधील सर्वोच्च खेळी आहे. बिग बॅश लीग 2024-25 च्या अंतिम लढतीत त्याने 11 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली होती.

पंजाबच्या संघात एन्ट्री कधी?

पीएसएलमध्ये केलेले कमिटमेंट पूर्ण झाल्यानंतर मिचेल ओवेन याची आयपीएलमध्ये एन्ट्री होणार आहे. यासाठी 16 मे ही तारीख उजाडणार असून जर पंजाबचा संघ प्ले ऑफमध्ये गेला तरच त्याला संघाकडून खेळता येईल. प्ले ऑफच्या लढती 20 मे पासून सुरू होणार आहेत.

IPL 2025 – पंजाबच्या मार्गात लखनौचा अडथळा