
पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात सात गावांतील शेतकरी एकवटले असून, त्यांनी भूसंपादनाला कडाडून विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी शनिवारी पोलिसांनी कुंभारवळण येथे शेतकऱ्यांवर बेफाम लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याने घाबरलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या अंजनाबाई कामठे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आयोजित शोकसभेत बोलताना अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना देखील फटकारले आहे.
पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनात मृत पावलेल्या अंजनाबाई महादेव कामटे यांच्या निवासस्थानी आज सांत्वनपर भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला. दिवंगत आत्माने आपल्या हक्काची शेतजमीन वाचविण्यासाठी शासन आणि प्रशासनविरोधात जोरदार लढा देऊन आपले बलिदान दिले आहेत. ईश्वर दिवंगत आत्मास शांती देवो… pic.twitter.com/GHU0R2Fzuw
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 4, 2025
”शेतकऱ्यांच्या परवानगी विरोधात पुरंदर विमानतळासाठी अधिग्रहित करण्यात येत असलेल्या शेत जमिनी प्रकरणी आज येथील शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा व संवाद साधला. मंत्रालयातील काही दलालांनी येथील गद्दारांना हाताशी धरून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्त दरात घेऊन नंतर चढ्या दराने विकण्याचा डाव आखला आहे. पुण्याचे विमानतळ येथून 36 किलोमीटर असताना येथे विमानतळाची काय आवश्यकता. विमानतळाची आवश्यकताच असेल तर बारामती येथे विमानतळ असून त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे. पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द करावा” अशी भूमिका यावेळी अंबादास दानवे यांनी मांडली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे,जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, तालुकाप्रमुख अभिजीत जगताप,जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर,सासवड शहर प्रमुख, राजेंद्र जगताप, उप तालुका राजेंद्र क्षीरसागर, शुभम झिंजुरके, कुंभारवळगावाचे सरपंच मंजुश्रीताई गायकवाड, उपसरपंच संदिप कामटे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.