
जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल या पार्श्वभूमीवर अनेक देश संरक्षण धोरणाकडे लक्ष देत आहेत. लष्करी बजेट वाढवणे आणि सैन्याची कुमक वाढवणे असे अनेक मार्ग स्वीकारले जात आहेत. ग्लोबल फायरपॉवरने सर्वाधिक लष्करी सामर्थ्य असलेल्या टॉप 10 देशांची यादी जाहीर केलेय. या माहितीनुसार, चीनकडे 20 लाख 35 हजार सक्रिय सैनिकी मनुष्यबळ असून सर्वाधिक सैन्य असलेला चीन प्रथम क्रमाकांचा देश आहे. या यादीत हिंदुस्थान दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
हिंदुस्थानकडे 14 लाख 55 हजार 550 इतके सक्रिय लष्करी मनुष्यबळ आहे. दक्षिण आशियात बळकट संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन हिंदुस्थानकडून होत आहे. अमेरिका तिसऱ्या स्थानावर असून त्यांच्याकडे 13 लाख 28 हजार सक्रिय सैन्य आहे. अमेरिकेने तंत्रज्ञानावर आधारित लष्करी गुंतवणूक केली असल्यामुळे सक्रिय सैन्याचा आकडा थोडा कमी केला आहे, तर पाश्चिमात्य देशांपैकी युक्रेन आणि रशियाने 2022 नंतर सक्रिय सैन्यांच्या संख्येत वाढ केली आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ताज्या आकडेवारीनुसार, शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर जागतिक स्तरावर लष्कराच्या खर्चात वाढ करण्यास सुरुवात झाली. मागच्या वर्षी हा खर्च एकूण 2.718 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला. 2023 च्या तुलनेत यात 9.4 टक्क्यांची वाढ आहे.
पाकिस्तानचा नंबर सातवा
लष्करी सामर्थ्याबाबत टॉप 10 देश म्हणजे चीन, हिंदुस्थान, अमेरिका, उत्तर कोरिया, रशिया, युक्रेन, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम. या यादीत पाकिस्तानचा क्रमांक सातवा आहे. पाकिस्तानकडे 6 लाख 54 हजार इतके सक्रिय मनुष्यबळ आहे. छोटा देश असलेल्या व्हिएतनामध्ये सहा लाख इतके लष्करी मनुष्यबळ आहे. 2022 साली व्हिएतनामकडे 4 लाख 70 हजार इतके सैन्य होते. तीन वर्षांत या देशाने लष्करी सामर्थ्य जास्त वाढवले आहे.