नाथसागराच्या सुरक्षेची एटीएसने केली पाहणी! पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाथ मंदिराचीही तपासणी

<<< बद्रीनाथ खंडागळे >>>

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय दहशतवाद विरोधी पथकाने पैठण येथील जायकवाडी धरण अर्थात नाथसागर व नाथमंदिर परिसराची पाहणी केली. कारगील युद्धापासून ही दोन्ही ठिकाणे पाकिस्तानच्या ‘हिटलिस्ट’वर असून, ‘एटीएस’तर्फे अचानक तपासणी करून भारत-पाकमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही संवेदनशील स्थळांचा सुरक्षा आढावा घेतला आहे.

केंद्र व राज्य गुप्तचर विभागातर्फे संत एकनाथ महाराज समाधी मंदिर व जायकवाडी धरणाची सुरक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार धरणाच्या संवेदनशील ठिकाणांची विशिष्ट कालावधीत दहशतवाद विरोधी पथकातर्फे तपासणी केली जाते. धरणाच्या भिंतीखाली असलेले प्रवेशद्वार, तेथील चौकी, दुचाकी-चारचाकी वाहनांची तपासणी केल्याचे रजिस्टर व तेथे झालेले वादविवाद यांच्याही सूक्ष्म नोंदी एटीएसतर्फे नियमितपणे घेतल्या जातात.

कारगीलनंतर धरणसुरक्षा ऐरणीवर

कारगील युद्धानंतर धरण सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. 26/11 चा मुंबई हल्ला तसेच ज्या ज्या वेळी पाकिस्तानने कुरापती काढल्या, त्या त्या वेळी नाथसागराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तामिळनाडूत अतिरेकी घुसल्याच्या पार्श्वभूमीवरही 12 सशस्त्र पोलिस धरण सुरक्षेच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. तामिळनाडू येथे सागरी मार्गाने पाकिस्तानी अतिरेकी घुसण्याच्या शक्यतेमुळे ही खबरदारी घेण्यात आली होती.

पॅरा मिल्ट्री नाही अन् सागरी सुरक्षा दलही नाही!

जायकवाडी धरणाची सुरक्षा हा वारंवार चर्चेचा विषय ठरलेला आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर नाथसागरवर ‘पॅरा मिल्ट्री’ तैनात करण्यात येणार होती. राज्य शासनाने तसा निर्णयही घेतला होता. पण अंमलबजावणी मात्र झाली नाही. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना जायकवाडी धरण उडवून देण्याची धमकी आली होती. मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत 2017 साली तारांकित प्रश्नात ‘नाथसागर प्रकल्पाची सुरक्षेसाठी सरकार काय उपाययोजना करत आहे ?’ असा सवालही त्यांनी केला होता. मुंबई गृह विभाग व पाटबंधारे प्रशासन यांनी संयुक्त बैठक घेतली. जायकवाडी धरणाची सुरक्षा थेट सागरी सुरक्षा दलाकडे सोपवण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे काय झाले ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.