IPL 2025 – कोलकात्याने सामना जिंकला, परागने मने! रियानचे शतक हुकल्याने चाहते हळहळले

अखेरच्या चेंडूपर्यंत दोलायमान हिंदोळय़ावर असलेल्या लढतीत अखेर कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या राजस्थानचा एका धावेने पराभव झाला. या पराभवापेक्षा त्यांचा कर्णधार रियान परागचे केवळ 5 धावांनी हुकलेले शतक चाहत्यांच्या मनाला चटका लावणारे ठरले. त्यामुळे कोलकात्याने सामना जिंकला असला तरी रियान परागने उपस्थित स्टेडियमवरील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. नाबाद अर्धशतक ठोकणारा आंद्रे रस्सेल या विजयाचा शिल्पकार ठरला.

कोलकात्याकडून मिळालेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 8 बाद 205 धावांवर संपुष्टात आला. गुजरातविरुद्ध 35 चेंडूंत शतक ठोकून प्रसिद्धीच्या झोतात आलेला वैभव सूर्यवंशी मुंबईनंतर कोलकात्याविरुद्धच्या लढतीतही फ्लॉप ठरला. मुंबईविरुद्ध भोपळाही फोडता न आलेला सूर्यवंशी 4 धावांवर बाद झाला. जोफ्रा आर्चरला चौकार ठोकल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने रहाणेकडे झेल दिला. त्याच्या जागेवर आलेल्या कुणाल सिंग राठोडला भोपळाही फोडता आला नाही. मोईन अलीने त्याला रस्सेलकरवी झेलबाद केल्याने राजस्थानची 2 बाद 8 अशी दुर्दशा झाली. मग दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वालही 34 धावांवर बाद झाला. मोईन अलीनेच त्याला रिंकू सिंगकरवी झेलबाद केले.

कोलकात्यात रियानचे तुफान

वरुण चक्रवर्तीने ध्रुव जुरेल व त्याच्या जागेवर आलेला वानिंदू हसरंगा यांना लागोपाठच्या चेंडूवर शून्यावर त्रिफळाचीत करून राजस्थानची मधली फळी कापून काढली, मात्र रियान परागने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना इतर फलंदाजांना हाताशी धरून 95 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 45 चेंडूंत पटकाविलेल्या या खेळीला 8 षटकार व 6 चौकारांचा साज होता. सिमरॉन हेटमायरनेही 29 धावांची खेळी करीत त्याला साथ दिली. परागने मोईन अलीच्या 13 व्या षटकात 5 षटकार ठोकून राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, मात्र हर्षित राणाने अरोराकरवी झेलबाद करून रियानचे वादळ थांबविले. याच राणाने आधीच्या षटकात हेटमायरलाही बाद केले होते. मग इम्पॅक्ट प्लेअर शिवम दुबे (नाबाद 25) व जोफ्रा आर्चर (12) यांनी राजस्थानला विजयाच्या दारापर्यंत नेले होते. शिवम दुबेने अरोराच्या अखेरच्या षटकात 6, 4 व 6 ठोकून विजय आवाक्यात आणला होता. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना दुसरी धाव घेताना आर्चर धावबाद झाला अन् राजस्थानचे विजयाचे स्वप्न भंगले. कोलकात्याकडून मोईन अली, हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले, तर वैभव अरोराला 1 विकेट मिळाली.

रसल-रिंकू जोडीची फटकेबाजी

दरम्यान, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 4 बाद 206 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर सुनील नरीन 11 धावांवरच बाद झाला, मात्र दुसरा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाझ (35) व कर्णधार अजिंक्य रहाणे (30) यांनी दुसऱया विकेटसाठी 33 चेंडूंत 56 धावांची भागीदारी करून कोलकात्याला सावरले. गुरबाझने 25 चेंडूंत 4 चौकार व एक षटकार लगावला, तर रहाणेने 24 चेंडूंत 2 षटकारांसह एक चेंडू सीमापार पाठविला. महिश थिक्षणाने गुरबाझला बाद करून ही जोडी फोडली, तर कर्णधार रियान परागने रहाणेला यष्टीमागे जुरेलकरवी झेलबाद करून राजस्थानला मोठे यश मिळवून दिले. मग इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अंगक्रिश रघुवंशी (44) व आंद्रे रसल (नाबाद 57) यांनी चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूंत 61 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जोफ्रा आर्चरने रघुवंशीला बाद करून ही जोडी फोडली. मग रसल व आलेला रिंकू सिंग यांनी अखेरच्या षटकामध्ये हाणामारी करीत कोलकात्याला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. रस्सेलने 25 चेंडूंत 6 षटकार व 4 चौकारांसह आपली नाबाद अर्धशतकी खेळी सजविली, तर रिंकूने 6 चेंडूंत नाबाद 19 धावा पटकावताना 2 षटकार व एक चौकार लगावला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, युधवीर सिंग, महिश थिक्षणा व रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.