
>> गणेश गुप्ते
बाई, बाटली आणि पैसा हे प्रत्येक गुन्ह्यामागचे प्रमुख कारण! मात्र, काळाच्या ओघात हे चित्र पूर्ण पालटले आहे. व्हॉट्सअॅप, चॅटिंग, स्टेट्स, इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे गुन्हेगारी वाढत आहे. वादावादी, भांडण, मारामाऱ्यांचे नव्हे तर थेट खुनापर्यंत होणाऱ्या या गुन्ह्यांमुळे पोलीससुद्धा वैतागले आहेत. सोशल मीडियावरील ‘भाईगिरी’ आता पोलिसांची डोकेदुखी बनली आहे.
इन्स्टाग्रामवर केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना भवानीनगरमध्ये घडली. आकाश मुशा चौगुले (वय २२, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेश उर्फ तात्या सायबु पवार (रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश पवार आणि राजेश उर्फ तात्या पवार हे दोघे नातेवाईक असून ‘तू माझ्या बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवरती मेसेजद्वारे मला का पाठवला’, असा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले व त्यांची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवार यांच्याकडे गेले.
राजेश पवार याने त्याच्या हाताने आकाश चौगुले याचा जोरात गळा पकडून व दाबून त्याला उचलून त्याच्या घरासमोर पडलेल्या दगडावरती जोरात आपटले. आकाश निपचित पडल्याचे पाहून राजेश हा तिथून त्याच्या मोटारसायकलवरून पसार झाला.
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे आणि पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती दिली.
वालचंदनगर पोलीस ठाण्याची तीन पथके बारामती तालुका व इंदापूरमध्ये रवाना केली. आरोपी कडबनवाडी गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी ही कामगिरी केली.