मुलगा दहावीत नापास… आई-वडिलांनी कापला केक! हा काही शेवट नाही असे म्हणत नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलाला दिले प्रोत्साहन

दहावी आणि बारावीचा निकाल लागण्याआधी विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या मनातही मोठी धाकधूक असते. मुलाला किती मार्क मिळतील, तो पास होईल की नापास होईल, या चिंतेने अनेक पालकांना झोप लागत नाही. परंतु कर्नाटकातील एका पालकांनी आपल्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलगा दहावीमध्ये नापास झाल्यानंतर या पालकांनी मुलावर कोणताही संताप व्यक्त केला नाही. उलट केक आणून कापत सेलिब्रेशन केले. दहावीत नापास होणे म्हणजे आपल्या आयुष्यातील शेवट नाही, असे सांगत त्याला पुन्हा परीक्षेला बसण्यास सांगितले. मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी घरी केक आणत त्याला भरवला.

कर्नाटकातील नव नगर येथे राहणारा अभिषेक चोलचगुड्डा हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत एक दोन विषयात नव्हे तर सर्वच्या सर्व सहा विषयांत नापास झाला, परंतु निकालानंतर त्याच्या आई-वडिलांनी कोणताही संताप व्यक्त केला नाही. आमच्या मुलाने वर्षभर अभ्यास केला होता. आम्ही जर आता त्याच्यावर ओरडलो तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल. तो आयुष्यातून खचून जाईल. त्यामुळे आम्ही त्याच्यावर न ओरडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला, असे या मुलाच्या पालकांनी सांगितले.

32 टक्के मिळाले

अभिषेकला 625 पैकी केवळ 200 गुण आणि 32 टक्के मिळाले. नापास झाल्यानंतरसुद्धा त्याच्या आई-वडिलांनी घरी केक आणला. केकवर 32 टक्के गुण लिहिले. केक कापण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.