
वाढलेले तापमान, बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून तो 22.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र असे असले तरी सध्या मुंबईत पाणीकपात केली जाणार नाही. राज्य सरकारकडून पाण्याच्या राखीव साठय़ाला आधीच मंजुरी मिळाली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमध्ये 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात आज उच्चस्तरीय बैठकीत मुंबईतील पाणीपुरवठय़ाचा आढावा घेतला. तलावातील उपलब्ध पाणीसाठय़ावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर पावसाच्या आगमनाबाबत हवामान खात्यासमवेत समन्वय साधून महानगरपालिका प्रशासनामार्फत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. असे असले तरीही मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, मुख्य जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे उपस्थित होते.
राखीव साठ्यातून मुंबईला पाणी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांतील पाणीसाठा घटल्याने पालिकेने राखीव कोटय़ाची मागणी केली होती. याला सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या मालकीच्या अप्पर वैतरणामधून 68 हजार दशलक्ष लिटर आणि भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लिटर असा 1 लाख 81 हजार दशलक्ष लीटर राखीव पाण्याचा कोटा पालिकेला मिळाला आहे.