पंकज अडवाणीची जेतेपदाची क्लासिक हॅटट्रिक; अंतिम फेरीत ध्रुव सितवालावर 5-2 असा विजय

जागतिक बिलियर्ड्स आणि स्नूकर विजेता पंकज अडवाणीने आपल्या क्लासिक खेळाची मालिका कायम राखताना सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक जेतेपदाची हॅटट्रिक साधली. अंतिम फेरीत त्याने अनुभवी ध्रुव सितवालावर 1-2 अशा पिछाडीवरून 5-2(10-150, 150-147, 81-152, 151-94, 150-136, 151-147, 150-137) असा विजय मिळवला आणि सीसीआय क्यू- स्पोर्ट्सचा राजा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत 28 जागतिक बिलियर्ड्स आणि स्नूकर विजेतेपद नावावर असलेल्या गतविजेता पंकजला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. दुसरीकडे, पहिल्या आणि तिसऱ्या फ्रेममध्ये वर्चस्व राखत सितवालाने प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, 1-2 अशा पिछाडीवरून पंकजने पुढील सलग चार फ्रेम जिंकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यात चौथा ब्रेक महत्त्वपूर्ण ठरला. या फ्रेममध्ये 145 गुणांच्या मोठय़ा ब्रेकसह 2-2 अशी बरोबरी साधली. या फ्रेममध्ये ध्रुवला 98 गुणांचा ब्रेक करता आला. आत्मविश्वास उंचावलेल्या अडवाणीने सातत्य राखताना पुढील तिन्ही फ्रेम्स जिंकल्या. तसेच 5-2 अशा फरकाने बाजी मारली. जेतेपदाची हॅटट्रिक साधणाऱ्या पंकज अडवाणीला सीसीआय ट्रॉफीसह 2.5 लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उपविजेता ध्रुव सितवालाने 1.5 लाख रुपयांची कमाई केली.

सलग तिसऱ्या जेतेपदानंतर अडवाणीने आनंद व्यक्त करताना, यंदाचे जेतेपद माझ्यासाठी स्पेशल आहे असे म्हटले. यावेळी त्याने सर्वच अनुभवी आणि युवा सहकाऱयांच्या खेळाची प्रशंसा केली. तसेच सर्वेत्तम आयोजनाबद्दल त्याने सीसीआय व्यवस्थापनाचे आभार मानले.