हडपसर-सासवड पालखीमार्गावर वाहतूककोंडी

हडपसर-सासवड पालखीमार्गावरील देवाची उरुळी ते फुरसुंगी उड्डाणपूल भागात वाहतूककोंडी पाचवीलाच पुजली आहे. त्यात सध्या पालखीमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला दुतर्फा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे देवाची उरुळी भागातील कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच कार पार्क करत असल्याने वाहतूककोंडीत भर पडली आहे. शनिवार, रविवारी तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

सध्या हडपसर ते सासवडपर्यंतच्या पालखीमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भराव टाकण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. दिवे घाटातदेखील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच, हडपसर भागात रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अनेक भागांत रस्त्याच्या कामामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे हडपसर ते दिवे घाट वाहतूक संथगतीने सुरू असते.

लग्नसराई सुरू असल्याने देवाची उरुळी भागात असलेल्या साडी दुकानांमध्ये बस्ता खरेदी करण्यासाठी शनिवार, रविवारी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या भागात मोठी वाहतूककोंडी होते. त्यात आता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव टाकण्यात आला आहे. कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना कार पार्क करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे ग्राहक थेट रस्त्यांवरच कार पार्क करत आहेत. रस्त्याच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, ग्राहक रस्त्यांवरच कार पार्क करत असल्याने शनिवार, रविवारी या भागांत मोठी वाहतूककोंडी होत आहे. कधीकधी दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालकांना तासन्तास वाहतूककोंडीमध्ये अडकून पडण्याची वेळ येत आहे. त्यामुळे या समस्येवर योग्य तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रविवारी होते अधिक गर्दी
रविवारी जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे रविवारी या भागात मोठी वर्दळ असते. मात्र, आता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.

दिवे घाटातही होते वाहतूककोंडी
दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम दिवस-रात्र सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने दिवे घाटातील डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठमोठे दगड रस्त्यावर येत असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. रस्त्याच्या कामामुळे घाटातील रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला आहे. त्यामुळे काही वेळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.