मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ

मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारी रात्री वादळी वाऱयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला असून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गिरगाव, वरळी, दादर, शीव, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरात मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास रिमझिम पाऊस पडला. तर उपनगरातील कांदिवली, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागात जोरदार वाऱयासह हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱया चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाटय़ाचा वारा सुटला होता. याचा फटका मुंबई शहर उपनगरासह वसई, ठाणे, पालघर या भागांनाही बसला.

झाड रिक्षावर कोसळून कल्याणमध्ये तिघांचा मृत्यू

सोसाटय़ाच्या वाऱयामुळे कल्याण पूर्व येथील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे भलं मोठं झाड रस्त्याने जाणाऱया एका रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत रिक्षाचा संपूर्णपणे चेंदामेंदा होऊन रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवासी जागीच ठार झाले. लता राऊत, तुकाराम ठेगडे असे मृत प्रवाशांचे नाव असून उमाशंकर वर्मा असे रिक्षाचालकाचे नाव आहे.