Big breaking राजस्थानची पाकिस्तानशी जोडलेली सीमा सील, पंजाब पोलिसांच्या सुट्या रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam terror attack) बदला घेण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याच्या एका दिवसानंतर, सीमाभागातील राज्ये राजस्थान आणि पंजाब अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही वाढत्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज असल्याने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानशी 1,037 किमी सीमा असलेल्या राजस्थानमध्ये हाय अलर्ट आहे. सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे आणि सीमा सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हिंदुस्थानी हवाई दल हाय अलर्टवर आहे. पश्चिम सेक्टरमध्ये लढाऊ विमाने आकाशात गस्त घालत असल्याने जोधपूर, किशनगढ आणि बिकानेर विमानतळांवरून उड्डाणे 9 मे पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे कळते.

सुखोई-30 एमकेआय जेट्स गंगानगर ते कच्छच्या रणापर्यंत हवाई गस्त घालत आहेत. बिकानेर, श्री गंगानगर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि चालू असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.