कंत्राटदाराला मोकळे रान देणारी सेवाधारित कंत्राटे रद्द करा! म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची आयुक्तांकडे मागणी

मुंबईची स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेचे सफाई कर्मचारी वर्षभर अखंडपणे करत असतात. पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी कचरा गोळा करणे, तो वाहनातून वाहून नेणे ही कामे व्यवस्थितपणे करत असतात, मात्र आता हीच कामे कंत्राटदाराकडून करून घेण्यासाठी सेवाधारित (सर्व्हिस बेसड्) सेवा पुरवण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे. ही कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली तर पालिकेला सर्वस्वी कंत्राटदारावरच अवलंबून राहावे लागेल. पालिकेची स्वायत्तता धोक्यात येईल. त्यामुळे कंत्राटदाराला मोकळे रान देणारी ही सेवाधारित कंत्राटे रद्द करा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबईत दररोज सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा गोळा करून, वाहनांमध्ये भरून त्याच्या विल्हेवाटीसाठी डम्पिंग ग्राऊंडवर नेला जातो. यासाठी रोज सुमारे 1 हजार 334 वाहने वापरली जातात. यापैकी काही वाहने महापालिकेच्या मालकीची, तर काही कंत्राटदारांमार्फत नेमण्यात आली आहेत. या कंत्राटांचे उत्तमरित्या व्यवस्थापन व्हावे यासाठी पालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांचे 14 गट करून गटनिहाय कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. तथापि, गटनिहाय कंत्राटाचे सेवाधारित (सर्व्हिस बेस्ड) आणि भाडेतत्त्वाधारित (हायरिंग बेस्ड) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. मात्र सेवाधारित कंत्राटदारांमुळे कंत्राटदारांना मोकळे रान मिळेल आणि त्यांची मनमानी वाढेल, अशी भीती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने व्यक्त केली.

हा तर खासगीकरणाचा डाव

सेवाधारित कंत्राटामुळे कचरा गोळा करून तो वाहनांतून डम्पिंग ग्राऊंडवर वाहून नेणारा कर्मचारी वर्ग मोटर लोडर, चालक, स्वच्छक, गॅरेजमध्ये काम करणारे विविध संवर्गाचे कर्मचारी यांना त्यांची नियोजित कामे न देता वेगवेगळी कामे दिली जातील. त्याचबरोबर या कामगार कर्मचाऱयांच्या सेवासुविधा बाधित होणार आहेत. हा एक प्रकारे पालिकेचा खासगीकरणाचा डाव आहे आणि याला सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे सेवाधारित कंत्राटे देण्याचा निर्णय तातडीने रद्द करा, अशी मागणी म्युनिसिपिल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.