
मुंबई शहरात ड्रोन उडवण्यास बंदी असतानादेखील पवई येथे ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. रविवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक पह्न आला. पवईच्या साकी विहार रोड येथे एक ड्रोन खाली पडताना दिसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता हैदराबादचा मूळ रहिवासी असलेल्या एका तरुणाने ड्रोन उडवल्याचे निदर्शनास आले. त्याने एक वर्षापूर्वी ड्रोन विकत घेतले होते. ते खराब झाल्याने त्याची दुरुस्ती करून तो चाचणी घेत होता. याप्रकरणी नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून त्याला ताब्यात घेतले.


























































