पुणेकरांच्या खिशावर दरोडा; पीएमपी प्रशासनाकडून भाडेदरात वाढ, दैनंदिन पासही महाग, किमान भाडे 5 रुपयांवरून थेट 10 रुपये

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीएल प्रशासनाने प्रवासी भाडेदरात लक्षणीय वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य पुणेकरांना आता अर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असून, आजवर पहिल्या टप्प्यांसाठी पाच रुपयांत मिळणाऱ्या तिकिटासाठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत. किलोमीटरच्या टप्प्यांनुसार प्रशासनाने सुधारित भाडेवाढ केली असून दैनंदिन पासच्या किमतीतही वाढ केली आहे. येत्या पंधरा दिवसांनंतर प्रत्यक्षात याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मंगळवारी (दि. 12) पीएमपीएलच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह (ऑनलाइन), पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. दीपा मुधोळ-मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अर्चना गायकवाड यांच्यासह पीएमपीएलचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पीएमपीएल प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली.

नव्या दरानुसार प्रवासी तिकिटे, स्टेज रचना आणि पास दरात बदल करण्यात आला असून, यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिकचा भार पडणार आहे. यापूर्वी प्रशासनाने डिसेंबर 2014 मध्ये भाडेवाढ केली होती. त्यानंतर आता अकरा वर्षांनंतर भाडेवाढ करण्यात आली आहे. आजवर 1 ते 78 किलोमीटरसाठी 2 किलोमीटरच्या अंतराने 1 ते 40 टप्प्यांत भाडे आकारणी केली जात होती. मात्र, विद्यमान भाडेप्रणालीत फेरबदल करून पहिल्या 1 ते 30 कि.मी. साठी 5 कि.मी.च्या अंतरासाठी 6 स्टेज आणि उर्वरित 30 ते 80 कि.मी. अंतरासाठी 10 कि.मी.च्या अंतराने 5 स्टेज अशा एकूण 11 स्टेजची रचना निश्चित केली आहे. पूर्वी 40 स्टेज आणि 2 किमी अंतरासाठी स्टेजरचना होती, जी आता सुधारण्यात आली आहे. नवीन दररचनेनुसार, 1 ते 5 कि. मी. अंतरासाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत.

“पीएमपीएलकडून मागील अकरा वर्षांपासून कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. भाडेदर फेररचनेबाबतचा प्रस्ताव पीएमपीएम प्रशासनाने तयार केला होता. त्याला संचालक मंडळाने मान्यता दिली. तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांनंतर प्रत्यक्षात सुधारित दराने तिकीट आकारणी केली जाईल.”

दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल.