
बलूच आर्मीकडून काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती. आता तेथील नेतेही पाकिस्तानविरोधात आक्रमक झाले असून बलूच नेते मीर यार बलूच यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. तसेच पीओके रिकामा करण्याच्या हिंदुस्थानच्या भूमिकेलाही पाठिंबा जाहीर केला आहे. बलुचिस्तानमधील नागरिकांनीच आता निकाल दिला असून जग आता दीर्घकाळ शांत राहू शकत नाही, असे मीर यांनी म्हटले आहे. त्यांच्या भूमिकेला बलुचिस्तानमधून जोरदार पाठिंबा मिळत असून जनता आक्रमक झाल्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्याने बिथरलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
गेल्या कित्येक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, बॉम्बस्फोट मानवी हक्कांचे उल्लंघन आणि बलूच नागरिकांना जबरदस्तीने गायब करणे, नसलेली कायदा आणि सुव्यवस्था यांपासून बलुचिस्तान मुक्त झाल्याचे मीर यांनी म्हटले आहे. बलूचचे प्रश्न, तेथील जनतेच्या मागण्या लावून धरणारे येथील मोठे नेते, लोकप्रतिनिधी मीर यार बलूच यांनी याप्रकरणी ‘एक्स’वरून एक पोस्ट केली आहे. ‘तुम मरोगे हम निकलेंगे, हम नसल बचाने निकले है, आओ हमारा साथ दो,’ असे आवाहन मीर यांनी केले आहे.
पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका
पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका. पाकिस्तानच्या नेत्यांच्या सह्या असलेला आणि 27 मार्च 1948 रोजी बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये सामील झाल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय किंवा तिसऱ्या देशाची मध्यस्थी सिद्ध करणारा एकही कायदेशीर पुरावा किंवा दस्तावेज पाकिस्तानकडे नाही, याकडेही मीर यांनी लक्ष वेधले आहे.
हिंदुस्थान पाकिस्तानला हरवण्यासाठी सक्षम आहे. पाकिस्तानी सैन्यालाच रक्तपातासाठी जबाबदार ठरवायला हवे. कारण पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या लोकांचा ढालीसारखा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बलुचिस्तान पाकिस्तान नाही
बलुचिस्तानातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यांनी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून बलुचिस्तान हा पाकिस्तान नाही, असे संपूर्ण जगाला सांगितले आहे. त्यामुळे जग केवळ प्रेक्षक बनून किंवा मूक बनून राहू शकत नाही, असेही मीर यांनी म्हटले आहे. एका पत्रकाराने एका मुलाखतीत मला विचारले होते, बलुचिस्तान कधी स्वतंत्र झाला. त्यावर मी उत्तर दिले होते, जेव्हा ब्रिटिशांनी 11 ऑगस्ट 1947 मध्ये बलुचिस्तान सोडला होता तेव्हाच तो स्वतंत्र झाला होता, असे उत्तर दिले होते, असेही मीर यांनी नमूद केले आहे.
बलूच नागरिकांना पाकिस्तानी म्हणून नका
बलूच नागरिकांना पाकिस्तानी म्हणणे बंद करा, असे आवाहन मीर यांनी हिंदुस्थानी नागरिक, प्रसारमाध्यमे, तत्त्वज्ञ, यूट्यूबर्सना केले आहे. आम्ही पाकिस्तानी नागरिक नाही, आम्ही बलुचिस्तानी आहोत. पंजाबी पाकिस्तानचे नागरिक आहेत. कारण त्यांनी कधीच बॉम्बस्फोटांचा सामना केला नाही, हिंसाचार सहन केलेले नाही, असेही मीर यांनी म्हटले आहे.
बलूच आर्मीचा हिंदुस्थानला पाठिंबा
बलूच आर्मीने पाकिस्तानविरोधातील कारवाईला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर बलूच महरंग महिलेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पाकिस्तानने कितीही बिलियन डॉलर्स खर्च केले तरी बलुचिस्तानवर झालेल्या अत्याचाराला लपवू शकत नाही. पाकिस्तान सरकार इतक्या खालच्या थराला गेले आहे की, आम्ही तुमच्याकडे न्यायही मागू शकत नाही. आम्ही स्वतः न्याय मिळवू, असे म्हणत या महिलेने हिंदुस्थान समर्थनाच्या घोषणा दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
पीओकेवर हिंदुस्थानच्या भूमिकेला पाठिंबा
पाकिस्तानने पीओके रिकामा करण्याच्या मागणीचे मीर यार बलूच यांनी समर्थन केले आहे. 14 मे रोजी हिंदुस्थानने पाकिस्तानला पीओके रिकामा करण्यास सांगितले होते, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. संयुक्त राष्ट्रानेही पाकिस्तानला तत्काळ पीओके सोडण्याचा आग्रह करायला हवा, जेणेकरून ढाक्यात त्यांच्या 93000 सैन्यांवर आत्मसमर्पणाची वेळ आली होती तशी वेळ येऊन त्यांना अपमान सहन करावा लागू नये, असेही मीर म्हणाले.