न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी एका प्रेमाची दुसरी गोष्ट पहायला मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीने न्यायालयात पीडितेला प्रपोज केले. यानंतर आरोपीची शिक्षा न्यायालयाने स्थगित केली. आरोपी आणि पीडितेने एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामुळे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने आरोपीची शिक्षा स्थगित करत, जोडप्याला कोर्टरूममध्ये एकमेकांना फुले देण्यास सांगितले.

आम्ही दोघांनाही जेवणाच्या वेळी भेटलो. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. दोघेही एकमेकांशी लग्न करण्यास तयार आहेत. लग्नाचे तपशील पालक ठरवतील. आम्हाला आशा आहे की लग्न लवकरात लवकर होईल. यामुळे आम्ही शिक्षा स्थगित करत याचिकाकर्त्याला सोडत आहोत, असे शिक्षेला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 6 मे च्या निर्देशानुसार, याचिकाकर्ता आज न्यायालयात हजर झाला. त्याला लवकर तुरुंगात परत पाठवले जाईल आणि संबंधित सत्र न्यायालयात हजर केले जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण?

पीडिता आरोपीच्या बहिणीची मैत्रीण असून फेसबुकद्वारे त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने 2016 ते 2021 दरम्यान पीडितेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी 2021 मध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या 5 सप्टेंबर 2024 च्या आदेशाला आरोपीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यात सीआरपीसीच्या कलम 389 (1) अंतर्गत शिक्षा स्थगित करण्याची त्याची याचिका फेटाळण्यात आली होती.