
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
पूर्वग्रहदूषित स्वभाव हा मानवी नातेसंबंध केवळ संपवत नाही, तर त्यांना मुळासकट उखडून टाकतो. हे नातेसंबंध एकदा का संपण्याच्या मार्गावर आले की, ते पुन्हा कधीही पूर्ववत होत नाहीत. कुठेतरी दुखावले गेल्याची भावना समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करून राहते आणि ती गाठ कधी कधी त्या व्यक्तीच्या अंतापर्यंत राहूही शकते.
गेल्या काही दिवसांपासून अन्वय आणि सुनीलची भांडणे ही उल्काच्या (नावे बदलली आहेत) डोकेदुखीचे कारण ठरत होती. अन्वय आता नववीत होता. सुनील आणि उल्काचा अत्यंत लाडका होता. साधारण सहावीपर्यंत बापलेकाचे मेतकूट अगदी छान जमत होते. मग हळूहळू अन्वयने कुठल्याही गोष्टीत मतप्रदर्शन केले किंवा कुठल्या गोष्टीवर नापसंती दाखवली की, सुनीलचा पारा चढायला सुरुवात होई आणि मग त्याचे पर्यवसान दोघांच्या भांडणांत होई. अन्वय मग धुसफूस करत माघार घेई आणि सुनीलला जग जिंकल्यासारखं वाटायला लागे. अन्वयची माघार ही उल्काला भारी पडत होती. कारण बाबांचा सगळा राग तो आईवर काढत असे. त्यामुळे उल्काला त्याची चिडचिड, धुसफूस सहन करावी लागे. कुठेतरी तीही मग अस्वस्थ, निराश आणि चिडचिडी होत होती.
उल्का आणि सुनील हे दोघेही आपापल्या नोकरीच्या ठिकाणी वरच्या पदावर काम करत होते. त्यामुळे त्या दोघांवर कंपनीची जबाबदारी होती. बहुतेकदा दोघांनाही घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी काम करावे लागे. अन्वयचाही शाळेनंतर क्लास, नंतर कराटे, स्विमिंग असे छंद वर्ग असल्याने तोही बिझी असायचा. तिघांनाही रात्री जेवणानंतर एकत्र फक्त एक तास मिळत असे. उल्काची हीच अपेक्षा असायची की, ‘फॅमिली टाइम’ हा हसत खेळत जावा आणि त्याच ऊर्जेत दुसरा दिवस सुरू व्हावा. पण तिची ही इच्छा अलीकडे पूर्ण होतच नव्हती. कारण बापलेक एकत्र असले तर ‘पाच मिनिटांची मजा आणि तासाची सजा’ हा प्रकार व्हायचा. मग तीही कंटाळून अन्वयला झोपायला घेऊन जायची. खोलीत गेल्यावर मग तो तिच्यावर उखडायचा. “मला आता घरात राहायची इच्छाच होत नाही आणि बाबांचं तोंडही बघणार नाही. तूही त्याला काही बोलत नाहीस,’’ असं म्हणून अन्वय रडायला लागे. त्याची कशीबशी समजूत काढून त्याला झोपवून ती मग सुनीलकडे येई, पण सुनीलही तिचं म्हणणं ऐकून घेत नसे.
“हे बघ. त्याची नाटकं मला ठाऊक आहेत. अजून मोटिव्हेट कर त्याला त्या फालतू वेब सीरिज बघण्यासाठी. अजून होऊ दे त्याला नाटकी!’’ सुनीलचं हे बोलणं तिला त्या दिवशी खूपच असंवेदनशील वाटलं. त्याच दिवशी तिने याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. ती अन्वयला उठवायला आतल्या खोलीत गेली आणि तसाच त्याला सुनीलच्या समोर उभा केला.
“मॅम, मला स्वतलाच कळत नव्हतं की, मी काय करत होते ते. या दोघांच्या भांडणांनी माझं डोकं अक्षरश आऊट केलं आहे,’’ उल्का समुपदेशन सत्राला आल्यावर सांगत होती. केबिनबाहेर सुनील बसला होता आणि अन्वय तिच्या शेजारी बसून ती जे काही सांगत होती ते सर्व ऐकत होता.
त्या दिवशी घडलेला प्रकार असा होता. अन्वय सुनीलसमोर जाताच पुन्हा दोघांची भडकाभडकी झाली. निमित्त होतं ते टीव्हीचं! अन्वयला सिनेमांमध्ये रस नव्हता आणि त्या रात्री सुनील सिनेमा बघत बसला होता. अन्वय अभ्यास करून कंटाळला होता. टाइमपास म्हणून तो अर्धा तास त्याची गाणी टीव्हीवर लावणार होता, पण त्या वेळी सुनीलने त्याची खिल्ली उडवली होती. “काय तुझा चॉईस? फालतू काहीतरी लावून बसतोस’’ असं म्हणत त्याने मस्करी केलेली अन्वयला लागली. “मला माहीत आहे तुझा चॉईस. तू पण कसले मीनिंगलेस मुव्हीज बघतोस आणि आम्हाला बघायला लावतोस.’’ असं म्हणून त्याला उलट उत्तर दिलं. सुनीलने त्याला फटकारलं आणि शब्दाला शब्द वाढला. उल्का मध्ये पडताच सुनीलने “तू गॉसिप करत बस आत जाऊन. चल जा!’’ असं म्हणत तिलाही फटकारलं. त्या रात्री ती आणि अन्वय अपमान गिळत झोपायला गेले. “आम्ही दोघंही झोपलो नाही रात्रभर. अन्वय तर आता सुनीलचं तोंडही बघायला तयार नाही. तुम्ही जरा त्याच्याशी बोलून बघता का?’’ तिने विनंती केली. सुनील आत आला तेव्हा तोही बऱयापैकी अस्वस्थ होता. त्याने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. “राग हा माझा पहिल्यापासूनचा इश्यू राहिलेला आहे. अगदी माझ्या आईवडिलांनाही याचा त्रास होतो आणि आता या दोघांना…’’ सुनील हा भयंकर शीघ्रकोपी होता. त्यात त्याची भाषाही रागात असल्यावर कठोर होत असे. इतकी की, समोरच्याला ऐकताना अपमानास्पद वाटत असे, पण सुनीलचा त्या वेळी स्वतवर ताबा राहत नसे आणि तो अविचाराने फक्त तोंडसुख घेत सुटे. ही त्याची वागण्याची पद्धत लक्षात आल्यावर ऑफिसमधील काही वरिष्ठांनी हे सहन केले नाही आणि तेही त्याच्याशी तसेच अपमानास्पद बोलायला लागले.
हे सर्व त्याच्या टीमसमोर व्हायला लागल्याने सुनीलला भयंकर अपमानित झाल्यासारखे वाटायला लागले. मग त्याचा राग त्याच्या टीमवरही निघायला लागला. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या टीमचे दोन कनिष्ठ अभियंते ऑफिस सोडून गेले आणि सोडण्याचे कारण “सुनील सरांचं अपमानास्पद बोलणं’’ असे स्पष्ट सांगून गेले. त्या वेळी सुनीलला ऑफिसमधून खूप ऐकून घ्यावे लागले. या प्रकारानंतर तो ऑफिसमध्ये शांत झाला पण ऑफिसच्या लोकांचे त्याच्याशी वागणे बदलले नव्हते.
“घरात अन्वय आणि तुझ्यात का चिडचिड होते आहे?’’ या प्रश्नावर तो पटकन उत्तरला. “कारण तोही त्यांच्यासारखाच वागायला लागलाय.’’ सुनीलने त्याची खदखद बोलून दाखवली. त्याच्या आणि अन्वयच्या समस्येचे मूळ सुनीलचे दुसऱयांबाबत पूर्वदूषित असलेले ग्रह होते, ज्यांच्या तडाख्यात अन्वय आणि उल्का सापडले होते. सुनील हा विलक्षण संतापी आणि शीघ्रकोपी माणूस होता. त्याची ही सवय त्याच्या वडिलांकडून आणि आजोबांकडून आलेली होती. त्यात त्याला स्वतमध्ये राहायची सवय होती. तो जास्त कोणाशी संवाद साधू शकत नसे. स्वभाव मनमोकळा नसल्याने तो कोशात असायचा. त्यात त्याला लहानपणापासून दुसऱया व्यक्तींबद्दल (वाईट) मत बनवण्याची खोड जडली. जी त्याच्या मानसिक अस्वास्थ्याला कारणीभूत ठरत होती. एकीकडे अन्वय नैराश्यात जात होता आणि दुसरीकडे उल्काही त्याला दुरावत चालली होती. तिसरीकडे नोकरीच्या ठिकाणीही त्याचे संबंध बिघडले होते.
सुनीलला हे सगळे समजल्यावर त्याला स्वतची लाज वाटली आणि त्याने स्वतला बदलण्याची तयारी दाखवली. त्याला महत्त्वाचं कारण होतं अन्वय आणि उल्काचं त्याच्यापासून दुरावणं. कारण उल्का या सगळ्यामध्ये इतकी दुखावली गेली होती की, तिला काही काळ नैराश्य कमी करण्यासाठी मानसोपचारही घ्यावे लागले. समुपदेशनातही तिने बऱयाच गोष्टी उघड केल्या. “मी याची इतकी काळजी घ्यायचे, पण एकदा रागारागात मला म्हणून गेला की, आयडियल बनण्याची एवढी कॉपी करू नको. नाहीतरी तुला सगळीकडे मोठेपणा घ्यायची सवय आहे. असं बोलल्यानंतर मी हर्ट झाले. अन्वयच्या बाबतीतही असेच काही तर्क लावून मोकळा होतो. आता आपल्या मुलावर विश्वास नको का? त्याच्या कपडय़ांवरून, त्याच्या आवडीवरून कायम शेरेबाजी. त्यामुळे अन्वय भरपूर दुखावलाय आणि दुरावलाय’’ असे तिने म्हणताच सुनीलच्याही डोळ्यांत चटकन पाणी आले.
सुनीलने खरोखर स्वतच्या या एका घातक सवयींवर काम करायला सुरुवात केली. तो नियमितपणे सत्रांना येत होता आणि त्याच्या अतार्किक आणि असंबद्ध विचारांच्या मुळाशी जायचा प्रयत्न करत होता. तो लहानपणापासून भिडस्त असल्याने त्याच्यावरही त्याच्या कुटुंबियांकडून आणि शिक्षकांकडून बरेच त्याच्याबद्दल उलटसुलट ऐकायला मिळाले होते. त्यामुळे त्याचा मूळचा भिडस्त स्वभाव एकलकोंडा झाला आणि समाजाबद्दल एक प्रकारची अढी त्याच्या मनात बसली होती. ती अढी आणि सुनीलच्या एकलकोंडय़ा स्वभावाला भिडस्त स्वभावात बदलणं हे एक आव्हान होतेच. यात उल्काची आणि अन्वयची साथ लाभत होतीच आणि सुनीलही त्याच्या मनात आलेले विचार व्यक्त करायला लागला होता.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)