काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे; नाव न घेता जयराम रमेश यांचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरचा तडाखा देत पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानची लढाई पाकड्यांशी नसून ती दहशतवाद्यांविरोधात आहे, असा संदेश देण्यासाठी केंद्र सरकारने जगभरातील विविध देशांत सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची घोषणा केली आहे. यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या मुद्द्यावरून राजकारणात तापले आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषदेत शशी थरूर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव

केंद्र सरकारने संसदीय शिष्टमंडळात सात खासदारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये काँग्रेसकडून दिलेल्या चार नावांव्यतीरिक्त खासदार शशी थरूर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. यावरून राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी त्यांचे नाव न घेता टोला लगावला. मी कोणत्याही व्यक्तींवर बोलणार नाही. पण काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे, असे जयराम रमेश यावेळी म्हणाले.

सरकारने चार नावे मागितली होती आणि आम्ही ती दिली. पण सरकारची प्रेस रिलीज आश्चर्यकारक होती. सरकारचे ही वर्तणूक प्रामाणिकपणा दर्शवत नाही. सरकार एका गंभीर प्रकरणात खेळ खेळत आहे. सरकारचे हे संधीसाधू राजकारण आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची मागणी पुन्हा एकदा करणाऱ्या ट्रम्प यांना सरकार थेट उत्तर देऊ इच्छित नाही, असे म्हणत सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी त्यांनी केली.

आम्ही नावांमध्ये बदल करणार नाही

जयराम रमेश पुढे म्हणाले, “सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे स्वागत आहे. पण नावे मागणे आणि नंतर ती जाहीर न करणे हा सरकारचा अप्रामाणिकपणा आहे. आम्ही चारही नावांमध्ये कोणताही बदल करणार नाही.”

सरकारच्या शिष्टमंडळाबाबत बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “किरेन रिजिजू यांनी आम्हाला चार नावे मागितली होती आणि आम्ही चार नावे दिली होती आणि आम्हाला अपेक्षा होती की शिष्टमंडळात 4 नावे असतील. आता काय होईल हे मी सांगू शकत नाही, काँग्रेसने आपले कर्तव्य बजावले आहे. सरकार प्रामाणिकपणे नावे मागत आहे या विश्वासाने आम्ही नावे दिली. सरकारच्या वागण्यातून प्रामाणिकपणा दिसून येत नाही. एका गंभीर विषयावर एक खेळ खेळला जात आहे. आम्ही सरळ बॅटने खेळत आहोत, परंतु सरकार कोणत्या बॅटने खेळत आहे हे आम्हाला माहित नाही, असे म्हणत जयराम रमेश यांनी सरकारवर टीका केली.

मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली