
ठाणे शहरात हक्काचे डम्पिंग नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही. त्यामुळे शहराचे नेतृत्व हे विकासाची दूरदृष्टी नसलेले आहे. यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. ठाणेकर नागरिक प्रचंड त्रस्त असून महापालिकेचा आणि सत्तेत असणाऱ्या काही लोकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोपदेखील आव्हाड यांनी केला.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी पक्षांतर केल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आहेत. आज ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. गेल्या 45 वर्षांत ठाणेकरांसाठी धरण बांधता आले नाही. 2 हजार कोटींचे रस्ते बांधले जातात, मग धरण का बांधता येत नाही असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. शहरातील गल्लोगल्ली कचरा आहे, पाणी नाही, नालेसफाईची कामे ठप्प आहेत, प्रत्येक तलावात सांडपाणी सोडले जाते, गटारांची सुविधा करता आली नाही. या सर्व कारनाम्यानंतर पालिका श्रीमंत असल्याचे दाखवले जात आहे, असे फटकारे आव्हाड यांनी लगावले.
नवे नारळ फोडा, पण लटकलेले प्रकल्प कधी पूर्ण करणार तेही सांगा ! राजू पाटील यांचा मिंधे पिता-पुत्रांना सवाल
पालिका निवडणुका जवळ आल्यामुळे डोंबिवलीकरांना विकासाची स्वप्ने दाखवली जात आहेत. त्यातच नागरिकांना खूश करण्यासाठी रविवारी मिंध्यांनी काही विकास प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण केले. दरम्यान, नवे नारळ फोडा, पण लटकलेले प्रकल्प कधी पूर्ण करणार तेही सांगा, असा खरमरीत सवाल मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी मिंधे पिता-पुत्रांना केला आहे.
राजू पाटील यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करीत मिंध्यांना लक्ष्य केले आहे. कल्याण ग्रामीण भागातील विकासासाठी आम्ही अनेक वर्षे प्रयत्न केले. मात्र राजकीय सूडबुद्धीमुळे प्रकल्पांवर अन्याय झाला असून रखडलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण कधी होणार हे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.