
मुंबईसह महाराष्ट्रात मांसाहार पदार्थांची ऑनलाईन विक्री करणारी लिशिअस फूड कंपनीच्या जाहिरातीमध्ये पारंपरिक मच्छीमार महिलांकडून विकले जाणारे मासे हे ताजे नसतात, असे दाखवून केवळ आमच्याच कंपनीकडे ताजे मासे असतात, असा दावा जाहिरातीतून करण्यात आला आहे. याला मुंबईतील मासे विकणाऱया कोळी महिलांनी तीव्र आक्षेप घेतला असून तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या कार्यालयावर धडक देत त्वरित ही जाहिरात बंद करा, अशी मागणी केली आहे.
लिशिअस फूड कंपनीच्या ताज्या माशाच्या जाहिराती या मोठय़ा प्रमाणात टीव्ही आणि सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र, स्वतःची जाहिरात करताना इतरांच्या मासे विक्रीला नावे ठेवण्याचा प्रकार, कमी समजण्याचा प्रकार कंपनीकडून सुरू आहे. या विरोधात कोळी महिलांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे लेखी तक्रार केल्यावर कक्षाचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लिशिअस कंपनीच्या कार्यालयाला भेट देत ही जाहिरात त्वरित बंद करावी, असे निवेदन दिले. जाहिरात बंद झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात खजिनदार देविदास माडये, कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे, कार्यालय चिटणीस राजेश चव्हाण, लक्ष्मण माडये, विजय पवार, संतोष हिनुकले सहभागी होते. दरम्यान, त्वरित जाहिरात बंद करू व तसे लेखी आश्वासन देण्यात येईल, असे शिष्टमंडळाला कंपनीचे प्रणय साळुंखे यांनी सांगितले.
अॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडियाकडेही तक्रार
कंपनीही सेम डे पॅच’ म्हणजेच त्याच दिवशी मासे पकडून विक्री करत असल्याची खोटी जाहिरात करत आहे, यावरदेखील कक्षाने आक्षेप नोंदवला व याबाबत अॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडेदेखील तक्रार नोंदवण्यात येणार आहे, असे शिष्टमंडळाने कंपनीला ठणकावले आहे.