
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तोफा-बंदुकांची धडधड सुरू असताना राज्य सरकारी सेवेतील चार अधिकाऱ्यांनी चीनचा दौरा केल्याचे उघड झाले आहे. हिंदुस्थानविरोधातील युद्धात चीनची पाकिस्तानला खुलेआम मदत सुरू असताना चार सरकारी अधिकारी चीनचा पाहुणचार झोडत असल्याचे सरकारी कागदपत्रांवरून पुढे आले.
चीनमधील गौंजावमध्ये ‘दी शू अॅण्ड लेदर फेअर’ हे चामडय़ाचे बूट आणि चामडय़ाच्या वस्तूचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. काwन्सिल ऑफ लेदर एक्सपोर्टच्या वतीने राज्य सरकारला आमंत्रण देण्यात आले होते. 15 ते 17 मे या काळात हे प्रदर्शन झाले. पण नेमका युद्धकाळात हा दौरा झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या अधिकाऱ्यांनी केला चीनचा दौरा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (अंधेरी) सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणार खेम्मर, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव डॉ. श्रीकांत पुलपुंडवार, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण व जिल्हा उद्योग पेंद्राचे (नागपूर) अधीक्षक शिवकुमार मुद्दमवार यांनी 11 ते 18 मे या काळात चीनचा दौरा केला.
दौऱ्याला कार्योत्तर मंजुरी
या शिष्टमंडळाचा दौरा पूर्ण झाला आहे, पण या दौऱ्याला खर्च किती आला याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जीआर जारी करून चीनच्या दौऱ्याला मंगळवारी कार्योत्तर मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा चीनचा दौरा उघड झाला, अन्यथा या दौऱ्याचा गवगवाही झाला नसता, असे उद्योग विभागातील अधिकारी सांगतात. महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून कार्योत्तर मंजुरी देण्याची प्रथा-परंपरा सुरू झाली आहे. दाओस दौऱ्यालाही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली होती. आता चीनच्या दौऱ्यालाही अशाच प्रकारे मंजुरी दिली आहे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.