
कोरोनाचा नवा व्हेरिएंट तुलनेत ‘सौम्य’ असेलही, परंतु ‘कोरोना’ नावाची दहशत, धाक आजही तोच आहे. कोरोनाकडे यापुढे एक स्थानिक आजार म्हणून पाहावे असे वैद्यक क्षेत्रातील मंडळी सांगत आहेत आणि त्यात तथ्यही आहे. जनतादेखील आता त्यादृष्टीने तयार होत आहे, परंतु कोरोनाची चाचणी करायची म्हटल्यावर आजही सामान्यांच्या अंगावर काटा येतोच. महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा पसरलेले कोरोनाचे सावट डॉक्टर मंडळी म्हणतात त्याप्रमाणे ‘धोकादायक’ नसेलही, परंतु ते ‘भीतिदायक’ आहे हे मात्र निश्चित. राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्यांच्या आपापसातील कुरघोड्यांमधून वेळ काढून कोरोनाच्या नव्या संकटाकडे पाहायला जमेल का? हाच खरा प्रश्न आहे.
भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग आदी देशांत आधीच कोरोनाचा प्रकोप झाला आहे. त्याआधी चीनमध्येही कोरोनाच्या लाटेचा तडाखा बसला होता. आता सिंगापूर, हाँगकाँगपाठोपाठ भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. परदेशातील कोरोनाचे रुग्ण हे जेएन 1, एलएफ 7 आणि एनबी 1.8 या नवीन व्हेरिएंटमुळे वाढले आहेत. हे कोरोना विषाणूचेच उपप्रकार आहेत. मात्र ते ओमायक्रॉन या सबव्हेरिएंटच्या तुलनेत अधिक धोकादायक आहेत का? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्याचा अंदाज यायला वेळ लागेल, असे आरोग्य यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना ‘अॅलर्ट’ दिला आहे. त्यामागे कोरोना रुग्णवाढीचा वेग हेदेखील एक कारण आहे. सिंगापूरमध्ये आठवडय़ाला कोरोना रुग्णसंख्या तब्बल 28 टक्क्यांनी वाढली. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात दुप्पट झाली आहे. भारतातदेखील कोरोना
सक्रिय रुग्णांची संख्या
सध्या 257 आहे. हा आकडा कमी असला तरी त्यात नव्या प्रकरणांची संख्या 164 आहे. म्हणजेच रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. हा एक प्रकारे धोक्याचा इशाराच म्हणावा लागेल. पुन्हा आधीप्रमाणेच आताही केरळ हेच सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य ठरले आहे. सध्या तेथे सक्रिय रुग्णांची संख्या 94 आहे. त्यात नवीन रुग्ण 69 आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तामीळनाडू (66 रुग्ण) आहे. त्यापाठोपाठ 56 सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राचा क्रमांक आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग तामीळनाडूपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहे आणि तीच चिंतेची गोष्ट आहे. 56 सक्रिय रुग्णांपैकी 44 प्रकरणे नवी आहेत. त्यावरूनही महाराष्ट्राला ‘कोरोना धोकादायक’ का म्हटले जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो. त्यावर राज्य सरकारने नेहमीप्रमाणे पठडीतले उत्तर दिले आहे. ‘सरकार पूर्ण सुसज्ज आहे’, ‘कोरोनाला घाबरू नका’, अशी नेहमीची पिपाणी सरकारने वाजवली आहे. हे सगळे ठीक आहे. जनतेनेही अफवांवर विश्वास न ठेवता आतापर्यंतच्या अनुभवांच्या जोरावर कोरोनाबाबत आधीच सावध राहायला हवे, परंतु ‘कोरोना’ या शब्दाची
दहशत अजूनही
सामान्यांच्या मनातून गेलेली नाही, त्याचे काय? कोरोना महामारी संपून, जनजीवन स्थिरस्थावर होऊन आता तीन-साडेतीन वर्षे लोटली आहेत. मात्र हा काळ कोरोनाचे सावट पूर्णपणे पुसले जाण्यासाठी पुरेसा नाही. कोरोनाची जागतिक महामारी, त्यामुळे करावे लागलेले लॉक डाऊन, या विषाणूने जगभरात केलेला लाखोंचा नरसंहार, अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि त्यातून उद्ध्वस्त झालेले जनजीवन हे सगळे अजून ताजेच आहे. त्या जखमांचे व्रण कायमच आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट तुलनेत ‘सौम्य’ असेलही, परंतु ‘कोरोना’ नावाची दहशत, धाक आजही तोच आहे. कोरोनाकडे यापुढे एक स्थानिक आजार म्हणून पाहावे असे वैद्यक क्षेत्रातील मंडळी सांगत आहेत आणि त्यात तथ्यही आहे. जनतादेखील आता त्यादृष्टीने तयार होत आहे, परंतु कोरोनाची चाचणी करायची म्हटल्यावर आजही सामान्यांच्या अंगावर काटा येतोच. महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा पसरलेले कोरोनाचे सावट डॉक्टर मंडळी म्हणतात त्याप्रमाणे ‘धोकादायक’ नसेलही, परंतु ते ‘भीतिदायक’ आहे हे मात्र निश्चित. राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्यांच्या आपापसातील कुरघोड्यांमधून वेळ काढून कोरोनाच्या नव्या संकटाकडे पाहायला जमेल का? हाच खरा प्रश्न आहे.