इम्पॅक्ट प्लेअरमुळे अष्टपैलूंचा रुबाब गेला

आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणजे प्रत्येक संघाचा कणा असायचा. केवळ अष्टपैलू खेळाडूंच्या जिवावर अनेक संघांनी आयपीएलचे विजेतेपद पटकाविलेले आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा, सुनील नरीन, हार्दिक पंड्या, पृणाल पंड्या, आंद्रे रस्सेल, ड्वेन ब्राव्हो अशा अनेक खेळाडूंची नावे घेता येतील. मात्र, आयपीएलच्या 18 व्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आला अन् अष्टपैलू खेळाडूंचा रुबाबही कमी झाला, हे स्पष्टपणे दिसत आहे.

गेल्या हंगामात कोलकाता संघाला विजेता बनवणारा सुनील नरीन (488 धावा, 17 विकेट) असो किंवा शेवटच्या दोन चेंडूंत 10 धावा काढून 2023 मध्ये चेन्नईला पाचवी ट्रॉफी जिंकून देणारा रवींद्र जाडेजा असो, यांची अष्टपैलू कामगिरी संस्मरणीय ठरलेली आहे, मात्र चालू हंगामात अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व मोठय़ा प्रमाणात संपुष्टात आले आहे. या हंगामात फक्त दोन खेळाडूंना हा आकडा गाठता आला आहे. यामध्ये कोलकात्याचा सुनील नरीन आणि मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात तब्बल आठ खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त धावा केल्या आणि 10 किंवा त्याहून अधिक विकेटही टिपले होते. आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडूंची भूमिका कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर नियम होय. या नियमानुसार संघ 11 ऐवजी 12 खेळाडूंसह मैदानावर प्रवेश करतात. गरजेनुसार प्लेइंग-11 मधील कोणत्याही खेळाडूऐवजी कोणत्याही फलंदाजाला किंवा गोलंदाजाला मैदानात उतरवले जाते. म्हणूनच संघ अर्धवेळ गोलंदाज आणि फलंदाजांऐवजी नियमित फलंदाज किंवा गोलंदाज निवडण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे आयपीएलमध्ये आता अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झाले आहे.

‘इम्पॅक्ट प्लेअर हा नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी मारक आहे. यापूर्वी फक्त 11 खेळाडू असल्याने काही खेळाडूंना वेगवेगळय़ा परिस्थितीत फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची अधिक संधी मिळत असे. पण इम्पॅक्ट प्लेअर नियमाने अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होत चालले आहे.’ – राहुल द्रविड (मुख्य प्रशिक्षक, राजस्थान रॉयल्स)

‘इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे संघातील अष्टपैलू खेळाडूंना ऐनवेळी बाकावर बसावे लागते. कारण सामन्याच्या मध्यावर प्रत्येक संघ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाज किंवा गोलंदाज मैदानावर उतरतो. अशा वेळी हमखास अष्टपैलू खेळाडूंचाच बळी दिला जातो. त्यामुळे हा नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी मारक आहे.’ – महेला जयवर्धने (प्रशिक्षक, मुंबई इंडियन्स)