परदेशी विद्यार्थ्यांचं हार्वर्ड विद्यापीठात शिकण्याचं स्वप्न भंगणार; ट्रम्प सरकारचा पुन्हा दणका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा जगभरात परिणाम दिसून आला. तसेच अमेरिकेतही त्याचे पडसाद उमटले. आता त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यावर संकट येऊ शकते.

आता ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळू शकणार नाही.ट्रम्प प्रशासनाच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) गेल्या गुरुवारी घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे 6,800 परदेशी विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामध्ये हिंदुस्थानातील 788 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाला 42 तासांच्या आत अमेरिकन सरकारला तेथे शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागेल. सध्या या विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व परदेशी विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये बदली घेण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांना अमेरिकेला कायमचे रामराम करावे लागेल.

गेल्या काही दिवसांपासून, परदेशी विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींवरून अमेरिकन सरकार आणि हार्वर्ड विद्यापीठात बेबनाव निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाने 30 एप्रिलपर्यंत परदेशी विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीर नोंदी दिल्य़ा नाहीत तर विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले जाईल, असा कडक इशारा गृह सुरक्षा विभागाने दिला होता. त्यामुळे विद्यापिठाने आपल्या कामाला वेग देऊन विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड सादर करायला सुरूवात केली आहे.