अभिप्राय- मानवी भावनांचा जिवंत दस्तऐवज

>> अनिल माने

माणसाच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात, जे त्याच्या अस्तित्वाच्या सर्व सीमांचा कस पाहतात. लेखिका संगीता भारत लोटे यांचे ‘इच्छामरण ः एक सत्यकथा’ हे पुस्तक मानवी संघर्ष, प्रेम, वेदना आणि सामाजिक व्यवस्थेतील गढूळ वास्तव यांचे अंगावर शहारे आणणारे दर्शन घडवते. आयुष्याच्या संघर्षाशी लढणाऱया एका स्त्राrच्या जिद्दीची, प्रेमाची आणि शोषण करणाऱया आरोग्य व्यवस्थेविरुद्ध चाललेल्या एका असहाय पण तितक्याच धीट लढय़ाची ही अस्सल कहाणी आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती 2017 साली एका आदर्श डॉक्टरांनी इच्छामरण मागितल्याच्या सत्य घटनेने. डॉ. भारत लोटे, रत्नागिरी जिह्यात ‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणून ओळख मिळवलेले आणि शासनाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित झालेले एक सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर होते. त्यांनी व्यावसायिक नफ्याच्या मागे न लागता आयुष्यभर आरोग्यसेवेचे व्रत जोपासले. इतरांचे दुखणे समजून घेतले होते. मात्र, नियतीने त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले. अचानक त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य ढवळून निघाले. आपल्या रुग्णांसाठी झिजलेल्या या डॉक्टरवर जेव्हा स्वतचे आयुष्य वाचवायची वेळ आली, तेव्हा मात्र त्यांना आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा आणि यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचा वाईट अनुभवा आला.

उपचारांसाठी त्यांना पुण्यातील नामांकित आणि सध्या विवादीत असणाऱया हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर निवारण तर मिळालेच नाही, उलट चुकीच्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यातच अत्यंत खर्चिक औषधोपचार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले. या सगळ्या संकटांत त्यांची पत्नी आणि दोन मुलांची आई असणारी संगीता भारत लोटे ही स्त्राr सर्व संघर्षाचा मुख्य आधारस्तंभ बनली. इथूनच कथा एका वेगळ्या दिशेने जाते.

एका साध्याशा ग्रामीण पार्श्वभूमीच्या, पण मनातून प्रचंड जिद्दी असणाऱया या स्त्राrचे प्रेम, चिकाटी आणि संघर्ष हा या पुस्तकाचा खरा प्राण आहे. नवऱयाच्या आजाराची भीषणता, दोन मुलांपैकी एकाची स्पेशल चाइल्ड म्हणून घ्यावी लागणारी काळजी आणि आर्थिक अडचणी, या तिहेरी संकटांमध्ये या स्त्राrने कुठेही हताश न होता, मूकपणे, तरीही जिद्दीने ही लढाई लढली. तिचा हा सगळा प्रवास अत्यंत हालअपेष्टांचा होता. एकीकडे आपल्या आजारी नवऱयाला कळू न देता उपचारांसाठी लागणाऱया आर्थिक बाबींची तजवीज करताना तिचा पदर ओलावत होता. तर दुसरीकडे, तिच्या नवऱयाच्या डोळ्यात इच्छामरणाची मागणी उतरू पाहत होती. ही एक अशी अवस्था होती जिथे शरीराचे कष्ट सोसण्यापेक्षा, जवळच्यांच्या डोळ्यातील विवशता पाहणे हे डॉ. भारत लोटे यांच्यासाठी अधिक असह्य झाले होते… आणि म्हणूनच, त्यांनी इच्छामरण मागितले. त्यांनी जरी परिस्थितीच्या असह्यतेपोटी या इच्छामरणाची मागणी केली असली, तरीही त्यांचा मृत्यू हा हॉस्पिटलच्या चुकीच्या उपचारांमुळेच झाला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतरही हॉस्पिटलकडून त्यांच्या कुटुंबीयांना छळ सहन करावा लागला. भारत लोटे यांना योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. पण व्यवस्थेतील हलगर्जीपणा, हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा आणि आर्थिक अपुऱया साधनांमुळे त्यांची अवस्था इतकी गंभीर झाली की, अखेर त्यांना स्वतच इच्छामरणाची मागणी करावी लागली होती.

संगीता लोटे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता हा संपूर्ण प्रवास शब्दबद्ध केला आहे. त्यामुळेच, हे पुस्तक वाचताना वाचकाला व्यवस्थेतील ढिसाळपणा, माणुसकीचा झालेला अपमान आणि एका कुटुंबावर आलेल्या अकल्पित दुःखाचा तीव्रतेने अनुभव येतो. त्यांनी ते सर्व अगदी थेट आणि सत्य मांडले आहे. त्यांची लेखनाची शैली अत्यंत साधी, सरळ आणि प्रांजळ आहे. त्यात असलेली प्रामाणिकताच वाचकाच्या काळजात घर करते. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून एक जिवंत अनुभव उलगडत जातो. या पुस्तकातून त्यांनी आपल्या पतीच्या व्यथेला एक मूक, पण अत्यंत हृदयस्पर्शी आवाज दिला आहे. हे पुस्तक वाचताना लक्षात येते की, संगीता लोटे यांनी केवळ बाह्य जगाशीच नाही, तर स्वतशीही लढा दिला आहे. ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गरीब व मध्यमवर्गीय वर्गाची सामूहिक वेदना आहे. पतीवर असलेले अथांग प्रेम, त्याने आयुष्यभर केलेल्या सेवाकार्याबद्दलचा अभिमान आणि अन्यायाविरुद्धचा लढा, हे सारे भाव ‘इच्छामरण ः एक सत्यकथा‘ या पुस्तकातून ठळकपणे उमटतात.